खड्ड्यावरून कोपरगावात रंगला कलगी-तुरा

अहिंसा चौकातील खड्डा केंद्रस्थानी : दुरूस्तीसाठी नगरपालिकेला मिळेना वेळ

कोपरगाव – कोपरगाव शहरातील अहिंसा चौकामध्ये गेल्या अनेक महिन्यापासुन पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली पालिकेने खड्डा खोदुन ठेवला आहे.शहराच्या मुख्य चौकामध्ये असलेल्या या खड्ड्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. नागरीकांनी वारंवार पालिकेकडे तक्रारी केल्या आंदोलने झाली. गांधीगिरी करण्यात आली. पण हा खड्डा काही दुरुस्त होईना. सध्या तरी या खड्ड्यावरून सोशल मिडियावर चांगलाच कलगी तूरा रंगला आहे.

अनेक महिन्यापासुन हा खड्डा दुरुस्त होईना. पालिकेला सक्षम अधिकारी नाही. मुख्याधिकारी नव्याने आले आहेत. त्यांना शहराची पहाणी करण्यात वेळ पुरत नाही.नगराध्यक्ष विजय वहाडणे यापुर्वीच्या सत्ताधाऱ्यांवर चुक सांगत होते. ते आता सोशल मिडियावर रंगत असतांना आमदार कोल्हे यांच्यावर निशाना साधला जात आहे. नगराध्यक्ष वहाडणे यांच्या विरोधातील रोष या खड्ड्यातून अनेकांनी व्यक्‍त केला.नगराध्यक्ष वहाडणे व त्यांचे समर्थक मागील कार्यकाळात झालेल्या चुकांची उजळी वाचत आहेत.

एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात वहाडणे-कोल्हे समर्थक दंग झाले आहे. या दोघांच्यामध्ये सामान्य नागरीक तंग झाला आहे. कोणाची चुक कोणाचे बरोबर या खोलात न जाता मुख्य रस्त्यातील खोल खड्डा बुजवुन नागरीकांच्या जीवाचा धोका कोण टाळणार हे अधिक महत्वाचे आहे. पालिकेच्या कुटील राजकारणाला शहरातील सामान्य जनता विटली आहे. सत्ताधाऱ्यांनी सत्तेबाहेरील लोकांवर आरोप करीत आपला वेळ घालविण्यापेक्षा कामातुन उत्तर द्यावे. आज कामाला महत्व आहे. तालुक्‍याचे व शहराचे लोकप्रतिनिधी निवडणुकीपुरते राजकारण करीत आहे. त्यांनी कामाच्या रूपाने विकास करावा.

पालिकेतील कर्मचारी हतबल झाले आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या बळावर नागरी सुविधा पुरवता येत नाही. पण नगराध्यक्ष वहाडणे व आमदार स्नेहलता कोल्हे या दोघांचे भाजपच्या मंत्रिमंडळात चांगले वजन आहे. दोघांनी एकमेकांतील मदभेद विसरून काम करावेत. कामे करण्याची दोघांची जबाबदारी आहे. मतभेद असले तरी पण मनभेद करून विकास होणार नाही. सामान्य जनतेला विकास हवा आहे. राजकारणाच्या कलगीतुऱ्यात शहराचे वाटोळे होवू नये. अनेक विकास कामे ठप्प आहेत. विकास कामांचा आलेला निधी वेळेत न वापरल्याने परत जातोय निधी. श्रेयवादाची लढाई अंतर्गत होणारे मतभेद कधी थांबणार हा कोपरगाकरांना पडलेला प्रश्‍न आहे.

रस्त्यावरील एका खड्ड्यावरून सोशल मिडियावर एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा एकजुटीने विकास कामे केले तर चर्चा फलित होईल. शहराच्या मुख्य रस्त्यामध्ये खड्डे खोदुन त्यावर ओभड धोबड खडी टाकल्याने पायी चालणाऱ्या अबाल वृद्धांना त्याचा त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. दररोज छोटेमोठे अपघात होत आहेत. शाळकरी मुले घसरून पडत आहेत. त्यांच्या वेदनांचा विचार नगराध्यक्षांसह सत्ताधारी, विरोधक, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी करावा. दुसऱ्यांच्या वेदनावर राजकीय कलगीतुरा करणे योग्य नाही.

शहराचा विकास करणे काळाची गरज आहे. बाजारपेठ ओस पडत आहे. सुविधांचा अभाव आहे. शहरातील अनेक रस्त्यांचे कामे अर्धवट अवस्थेत आहेत. नळांची गळती दिवसेंदिवस वाढत आहेत. पाण्याची गळती वाढली. पालिकेच्या आखतारीतील छोटे छोटे काम त्वरीत होणे गरजेचे आहे. शहरात दररोज अतिक्रमण वाढत आहे. याला जबाबदार कोण आहे. राजकीय कार्यकर्त्यांपेक्षा जबाबदार अधिकारी आहेत. चुकीच्या कामाला खतपाणी घालणाऱ्यांची संख्या अधिक आहे. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी या दोघांची मुख्य जबाबदारी आहे. एकमेकांनी विश्वासात घेवुन शहराचा विकास करणे आवश्‍यक आहे. अशी अपेक्षा कोपरगावकरांकडून व्यक्‍त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)