दरोड्याच्या तपासासाठी वीस पथके

सीसीटीव्हीत 14 जणांचे चेहरे; आणखी गुन्हेगार असण्याची शक्‍यता

कोपरगाव – कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावर पडलेल्या दरोड्याच्या तपासासाठी पोलिसांची वीस पथके राज्यभर पाठविण्यात आली आहेत. “सोशल मीडिया’वर जे सीसीटीव्ही फुटेज फिरते आहे, ते सत्य आहे. त्यातील दरोडेखोरांची माहिती, नावे तातडीने कळवावीत. त्यांची नावे गुप्त ठेवली जातील. तसेच योग्य मोठे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. क्षेरींग दोरगे यांनी घटनास्थळी भेट दिली. कोपरगाव येथे येऊन त्यांनी माहिती घेतली. या वेळी आ. स्नेहलता कोल्हे उपस्थित होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यांशी या प्रकरणी चर्चा झाली असून तातडीने आरोपींचा शोध लावण्याची मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली.

कोपरगाव शहरातील बाजारतळ भागात जय तुळजाभवानी शॉपिंग सेंटरमध्ये 6 एप्रिल 2006 रोजी तीन दुकाने फोडून काल्या-नांगऱ्याच्या टोळीने मोठ्या प्रमाणात ऐवज लुटला होता. त्या वेळी दरोडा टाकण्यासाठी जशी पद्धत वापरली, तशीच पद्धत कोळपेवाडी येथे दरोडा टाकाताना दरोडेखोरांनी वापरली आहे. त्या वेळी या घटनेचा तपास सोमनाथ घार्गे यांनी केला होता. त्यांचे मार्गदर्शन घेऊन कोळपेवाडी येथील दरोड्याचा तपास करण्यासाठी यंत्रणा हलविली जात आहे.

शिर्डी व संगमनेरचे प्रांताधिकारी, त्या त्या ठिकाणचे तहसीलदार, श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे यांना व पोलीस यंत्रणेला ज्या त्या गावांत मुक्कामी थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरोडा पडल्यामुळे कोपरगाव तालुक्‍यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे लक्षात घेऊन येथे राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती शर्मा यांनी दिली.

दरोडेखोरांच्या तपासासाठी लॉज, हॉटेल, धाबे आदी ठिकाणांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. तसेच दरोडेखोरांची माहिती देण्यासाठी व्हॉटसॅप क्र. 8888310000, 9764137100, 9766703296 हे क्रमांक दिले असून नागरिकांनी माहिती मिळाल्यांस संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. दरोड्यानंतर “लक्ष्मी ज्वेलर्स’ मध्ये लाकडी दांडा, कोयता व मॅगेझिन व काडतूस सापडले आहे. सीसीटीव्हीमध्ये 14 लोक दिसत असले, तरी या टोळीमध्ये अजूनही गुन्हेगार असण्याची शक्‍यता असून त्यांचा शोध सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)