पाणी न दिल्यास शेतकरी कायदा हातात घेतील – खा. लोखंडे

कोपरगाव - सर्व शोतकऱ्यांना आवर्तनाचे पाणी देण्यात यावे, या मागणीचे निवेदन पाटबंधारेमंत्री गिरीश महाजन यांना देताना खा.सदाशिव लोखंडे, प्रमोद लबडे व शेतकरी.

कोपरगाव – गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात अगोदरच दुष्काळापेक्षाही वाईट परिस्थिती आहे. लोकप्रतिनिधींच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बीला दोन व उन्हाळी एक आवर्तन देण्याची घोषणा झाली. मात्र प्रत्यक्षात रब्बीच्या आवर्तनातच फक्त अडीच किमीपर्यंतच्या शेतकऱ्यांनाच पाणी देणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना पाणी द्या, अन्यथा शेतकरी कायदा हातात घेतील, असा इशारा खा. सदाशिव लोखंडे यांनी पाटबंधारीमंत्री गिरीश महाजन यांची शिष्टमंडळासमवेत भेट घेऊन दिला.

गोदावरी पाणी संघर्ष समितीच्या वतीने जलसंपदामंत्री महाजन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, प्रमोद लबडे, शिवाजी ठाकरे, किरण खर्डे, पोपट गोरडे, रावसाहेब टेके आदींसह शेतकरी उपस्थित होते. कालवा सल्लागार समितीची बैठक कोपरग किंवा राहता येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होणे आवश्‍यक होते. अगोदरच जायकवाडीला पाणी सोडताना गोदावरी नदी काठच्या सर्व शेतकऱ्यांवर अन्याय झालेला असताना आता रब्बीच्या आवर्तनात गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय केला जात आहे.

नाशिक पाटबंधारे विभाग गोदावरी कालव्यांच्या बाबतीत गंभीर नसून, परिणामी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रब्बीचे आवर्तन मिळणार म्हणून, शेतकऱ्यांनी कर्ज काढून कांदा, गहू, फळबागा, मका, हरभरा, ज्वारी यासारखी पिके उभी केली. मात्र पहिल्याच आवर्तनात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने शेतकाऱ्यांत असंतोष झाल्याने रामपूरवाडी, चांगदेवनगर व कोपरगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले ल्याचे लबडे यांनी ना. महाजन यांना सांगितले.

त्यानंतर ना. महाजन यांनी अधिकाऱ्यांना सूचना देऊन वस्तुस्थितीची माहिती द्या, असे आदेश दिले. मात्र लाभक्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधींनी व साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी मुंबईच्या बैठकीत नेमकी आवर्तनाबाबत काय चर्चा झाली, मंत्र्यांसमोर अधिकाऱ्यांनी आवर्तन देण्याची तयारी कशी दाखवली, हा खरा प्रश्न आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पाण्याची मागणी केली आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळालेच पाहिजे, असा आग्रह खा. लोखंडे व समितीने लावून धरला. अन्यथा शेतकरी आता कायदा हातात घेतील व त्यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी म्हणून मलाही उतरावे लागेल, असा इशारा यावेळी खा. लोखंडे यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)