विजय वहाडणे : शहरी भागासाठी अत्यल्प निधीची तरतूद

कोपरगाव – जिल्हा नियोजन समितीकडून जिल्ह्यासाठी 588 कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा मंजूर करण्यात आला आहे; परंतु हा निधी अत्यंत कमी आहे. कोपरगाव शहरातील विविध कामे मार्गी लावण्यासाठी किमान शंभर कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे केली.

नगर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात करावयाच्या विविध विकासकामांच्या निधीबाबत पालकमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी स्वतंत्र बैठक घेतली. नगरपालिकांना निधीबाबत व विकासकामांत येणाऱ्या अडचणीबाबत वहाडणे यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले. जकात बंद झाल्यामुळे नगरपालिकांचे उत्पन्नाचे साधन हिरावले गेले. त्यापोटी सरकार देत असलेले अनुदान कर्मचाऱ्यांच्या वेतनालाही पुरत नाही. पर्यायाने नगरपालिकांना विकासकामांसाठीचा निधी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करावा लागतो. नगरपालिकांची आर्थिक स्थिती खालावल्याने विकासकामे करता येत नाहीत.

2017-18 या वर्षात नगरोत्थान निधीतून पालिकेला निधी मिळालेला नाही. जिल्हा नियोजन समितींतर्गत असलेल्या नागरी दलितेत्तोर सुधार योजनेचा शासन निर्णय आठ वर्षांपूर्वी काढला, तरीही त्याचा निधी मिळाला नव्हता. आता या आर्थिक वर्षापासून हा निधी मिळायला सुरुवात झाली आहे; परंतु हा निधी अत्यंत कमी आहे. नागरी भागावर हा अन्याय असल्याची भावना वहाडणे यांनी व्यक्त केली.

नगरपालिकांच्या प्रस्तावांना चार-पाच महिने प्रशासकीय मंजुरी मिळत नाही. मागील आर्थिक वर्षाचा निधी पुढील वर्षात वितरीत केला जात असल्यासने तो निधी उशिरा खर्च होतो. हा निधी खर्च न झाल्याने जिल्हा नियोजन समितीकडून नवीन निधी मिळणार नाही, असे सांगितले जाते. ही बाब चुकीची आहे. जिल्ह्यातील 35 टक्के नागरी लोकसंख्येच्या विकासासाठी दहा टक्के आर्थिक तरतूद ठेवणे ही बाब प्रशासकीयदृष्टया चुकीची आहे.

यापूर्वीही नगर जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्षांनी जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत; परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा नियोजन विभाग व संबंधित अधिकारी नगरपालिका तसेच नगरपंचायतींना अनुदान देण्याकडे दुर्लक्ष करतात. शासन निर्णयाचीही ते वासलात लावतात, असा आरोप वहाडणे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)