नेवासे – नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथील लक्ष्मीबाई रामभाऊ गंधारे यांचे काल निधन झाले. त्यांचा मुलगा विठ्ठल रामभाऊ गंधारे यांचे नुकतेच निधन झाले. मुलाच्या निधनाचे दुःख आईला सहन न झाल्याने मुलापाठीमागेच आईचाही मृत्यू झाला. हे दुःख कमी की काय म्हणून गावात स्मशानभूमी नसल्याने याच घरातील चौथ्या व्यक्तीवर स्मशानभूमी अभावी रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली.
पंधरा दिवसांपूर्वी विठ्ठल गंधारे यांचा अंत्यविधी स्मशानभूमी अभावी पुनतगाव-खुपटी रस्त्यावर करावा लागला होता. जायकवाडीला नदीने पाणी चालू असून, त्या पाण्यामुळे नदीपात्रात अंत्यविधीस अडचण निर्माण झाल्याने पंधरा दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी अंत्यविधी केला आता त्याठिकाणीही पाण्याचा तुंब आल्याने अंत्यविधी कुठे करायचा, हा पेच पडला होता.
याअगोदरही मयत लक्ष्मीबाई गंधारे यांच्या मयत मुलाने व ग्रामंस्थांनी स्मशानभूमी संदर्भात शासनास वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला होता. पण त्यांच्या पत्राची शासनाने दखल घेतली नाही. पुनतगावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी हे प्रवरा नदीपात्रात करण्यात येतता. पण पावसाळ्यात नदी पाणी आल्यानंतर व त्या नदीपात्रावर असलेला बंधारा भरल्यानंतर सहा ते सात महिने नदीपात्रात पाण्याचा तुंब असल्याने जर त्या काळात एखाद्याचा मृत्यू घडला, तर अंत्यविधीस अडचणी येतात.
“वेळोवेळी स्मशानभूमीसाठी शासनास पत्रव्यवहार केला. पण त्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अंत्यविधी ग्रामपंचायत पुढे करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यापुढे काही घटना घडल्यास जागेचा प्रश्न न सुटल्यास तहसील कार्यालयासमोर अंत्यविधी करणार. -दीपक धनगे, ग्रामस्थ
गंधारे कुटुंबातील व्यक्तीचा पंधरा दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. यावेळीही रस्त्यावर अंत्यविधी करण्याची वेळ आली होती. आज त्याच कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीवर रस्त्यावरच अंत्यविधी करण्याची वेळ आली, हे दुर्दैव म्हणावे लागले.त्यामुळे जागेअभावी व वेळोवेळी स्मशानभूमी संदर्भात पत्रव्यवहार करूनही शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने शासनाचा निषेध म्हणून पुनतगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यविधी करण्याचे ग्रामंस्थांनी ठरविले होते.
घटनेची माहिती कळताच नेवासा तहसीलदारांनी मंडलाधिकारी भाऊसाहेब शेळके व नेवासा पोलीस स्टेशनचे देवकते यांना घटनास्थळी पाठविले. माजी सरपंच साहेबराव पवार यांनी तातडीने ग्रामसभा घेऊन गावातील जागेचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्याचे सांगितल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली. ग्रामपंचायतीच्या समोर होणारा अंत्यविधी हा पुनतगाव-खुपटी या मुख्य मार्गावर करण्यात आला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा