पतसंस्थांच्या थकीत अकराशे कोटींची वसुली

सहकार आयुक्त सतीश सोनी : उर्वरित 720 कोटींची वसुली लवकरच

कोपरगाव, दि. 24 (प्रतिनिधी) – राज्यात 462 सहकारी पतसंस्था अडचणीत होत्या. त्यांची 1 हजार 820 कोटी रुपये कर्ज थकबाकी होती. मात्र सहकार खात्याने त्यापैकी 1100 कोटी रुपयांची वसुली केली असून, उर्वरित 192 पतसंस्थांच्या कर्जदारांकडून 720 कोटींची वसुली करण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्याचे सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथील समता पतसंस्थेच्या वतीने व्हाऊचरलेस बॅंकिंग प्रणाली सेवेचा प्रारंभ सोनी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय सहनिबंधक आर. सी. शहा, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे, सहायक निबंधक आर. एल. त्रिभुवन व जितेंद्र शेळके आदी उपस्थित होते. पतसंस्था फेडरेशनचे राज्य अध्यक्ष काका कोयटे यांनी स्वागत केले.

सोनी यांनी पतसंस्थांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी पतसंस्थांचे ठेवीदारांना संरक्षण, नियामक मंडळ, कडक वसुली, अत्याधुनिक तंत्रप्रणाली व कर्जदार-ठेवीदारांशी संस्था चालकांचा संवाद, या पंचसूत्रींचा अंगीकार केल्यास सहकार चळवळीला नवचैतन्य प्राप्त होईल, असा विश्‍वास व्यक्त केला.

कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात समता पतसंस्थेच्या माध्यमातून कोयटे यांनी जी कार्यप्रणाली अवलंबली ती राज्यात आदर्शवत मॉडेल ठरत असून, असलेल्या समता पतसंस्थेचे सर्वांनी अनुकरण करावे. राज्यात पतसंस्थांची नुसती संख्यात्मक वाढ न होता गुणात्मक वाढ अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी काका कोयटे यांनी इंडोनेशिया, फिलिपिन्स या देशांनी त्यांच्या सहकारी चळवळीत ज्या योजना कार्यान्वित केल्या आहेत, त्याची माहिती देऊन समता पतसंस्थेच्या एकूण ठेवीदारांपैकी 97 टक्के ठेवीदार निश्‍चित सुरक्षित असल्याचे केलेल्या गुुंतवणुकीवरुन दाखवून दिले. समताचे दैनंदिन व मासिक अहवाल पाहुन सहकार आयुक्त व त्यांचे सहकारी अचंबित झाले. त्यांनी राज्यातील पतसंस्थांकडून एमआयएस अहवाल पाठवताना पतसंस्थांचे किती टक्के ठेवीदार सुरक्षित आहेत, हे सहकार खात्याला लगेच समजून येईल.

समता पतसंस्थेचा नक्कीच गौरव होईल

समता पतसंस्थेचे राज्यात आदर्शवत काम सुरू असताना सहकार खाते त्यांची पुरस्कारासाठी दखल का घेत नाही, याची विचारणा यावेळी पत्रकारांनी केली असता, त्याची दखल घेऊन समता पतसंस्थेचा गौरव होईल, असे सहकार आयुक्त सोनी यांनी सांगितले. तसेच अवसायनात निघालेल्या येथील मर्चंट बॅंकेला एकरकमी परतफेड योजनेस 8 टक्के दर लागू झाल्याची माहिती सोनी यांनी यावेळी दिली.

सहकारी संस्थांना संरक्षण देण्यासाठी पतसंस्था फेडरेशनने पुढाकार घ्यावा

राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या धर्तीवर ज्या योजना आहेत, त्याची अंमलबजावणी पतसंस्था व अर्बन बॅंकेच्या स्तरावर होऊ शकते का, याचा विचार शासनस्तरावर सुरु आहे. मुळात सहकारी संस्था या स्वबळावर चालवाव्यात, असे शासनाचे धोरणच आहे. राज्यातील पतसंस्थांच्या ठेवीदारांना संरक्षण देण्याचे महत्वपूर्ण काम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनने पुढाकार घ्यावा, त्यासाठी त्यांनी दिलेल्या प्रस्तावास सहकार खाते निश्‍चित सहकार्य करील, अशी ग्वाहीही यावेळी सोनी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)