कोट्यवधींचा निधी मंजूर, तरी विकासकामे प्रलंबित कशी?

आमदार कोल्हे यांनी मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब : कत्तलखान्याचे काम दहा दिवसात सुरू करण्याचे आदेश

कोपरगाव – शहरातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करूनही रस्ते, कत्तलखाना, नाट्यगृह, खोकाशॉप आदी प्रश्‍न मार्गी का लागत नाहीत? विकासासाठीचा पैसा तिजोरीत तसाच पडून आहे, असा जाब विचारत आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना चांगलेच धारेवर धरले.
शहराचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कत्तलखान्यांचे काम येत्या दहा दिवसात सुरू करा, असा आदेशही त्यांनी सरोदे यांना दिला.

आमदार कोल्हे यांनी शहरातील विविध प्रलंबित प्रश्‍नांच्या सोडवणुकीबाबत येथील संपर्क कार्यालया++त सत्ताधारी भाजप-सेना नगरसेवक, गटनेत्यांबरोबर शुक्रवारी सकाळी बैठक घेवून चालू आणि बंद असलेल्या कामांचा आढावा घेतला. या प्रसंगी उपनगराध्यक्ष विजय वाजे, गटनेते रवींद्र पाठक, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई राजेंद्र सोनवणे, पराग संधान, गटनेते योगेश बागूल, करीम कुरेशी, अतुल काले, कैलास जाधव, स्वप्नील निखाडे आदींनी चर्चेत भाग घेतला.

त्यांच्या बदलीनंतरही निधीचा विनियोग नाही..

तत्कालिन मुख्याधिकारी शिल्पा दरेकर या काम करू देत नाहीत, असा आरोप केला जात होता. मात्र आता तुमच्या पसंतीचा मुख्याधिकारी येवूनही निधीचा विनियोग का होत नाही? दिवाळसणांच्या अगोदर शहरातील विस्थापित टपरीधारकांचे पूनर्वसन करा, भाजी बाजारासमोर तयार असलेल्या गाळ्यांचे लिलाव करा, शहरातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची ठेकेदाराने डागडुजी करावी. रस्ते खड्डेमुक्‍त करावेत, असे आदेश त्यांनी दिले.

पैसे नसणाऱ्या ठेकेदारांना कामे दिलीच कशी?

आमदार कोल्हे कोट्यवधींचा निधी आणतात, मात्र कामे तर काहीच दिसत नाहीत, असा आरोप केला जातो. मात्र निधी आणल्यानंतर त्या कामासाठीचा पाठपुरावा ज्याने त्याने आपापली जबाबदारी समजून ती मार्गी लागण्यासाठी काम करावे. रस्त्याचे काम करण्यासाठी ज्यांच्याकडे पैसे नाहीत, अशा ठेकेदारांना कामे दिलीच कशी? असा प्रश्‍नही आमदार कोल्हे यांनी उपस्थित केला.

निधी आणतो आपण, उद्‌घाटन करतात भलतेच..

शहरातील सर्व ठेकेदारांची एकदा बैठक बोलवा. मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करा, रस्त्यासाठी निधी आपण आणतो. मात्र त्याची उद्‌घाटने भलतेच लोक करत आहेत. 42 कोटीच्या पाणी योजनेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. मात्र त्याचे 3 कोटींचे अंतिम पेमेंट काढण्यात आले, असा आरोप नगरसेवकांनी केला. त्यावर नगराध्यक्ष वहाडणे यांचे नाव न घेता कोल्हे म्हणाल्या मुख्याधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारणे आवश्‍यक होते.

आमदार कोल्हे म्हणाल्या की, मंत्रालयीनस्तरावर शहर व तालुक्‍याच्या विकासकामांसाठी निधी आणताना मोठी कसरत करावी लागते. मात्र निधी आणूनही त्याचा विनियोग होत नाही. त्यामुळे खंत वाटते व जनतेला दिलेल्या आश्‍वसनांबाबत कोणत्या तोंडाने सामोरे जायचे. वर्षे दोन वर्षे ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देवूनही कामे का होत नाही. कत्तलखाना, खोका शॉप ही कामे तातडीने मार्गी लागावी, असे आदेश दिले होते. ते अद्यापही सुरू का झाले नाही, असा सवाल त्यांनी केला.

शहरात आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. साथीच्या आजारांमुळे रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी संपूर्ण शहरात किटकनाशक फवारणी करून नागरिकांना दिलासा द्यावा. बसस्थानकाची निविदा निघाली. त्याचा ठेकेदारही नेमण्यात आला. शहर हद्दवाढीसंदर्भात प्रस्ताव दिला. त्याचे अंतिम पत्र येणे बाकी आहे. तत्कालीन मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी नगरपालिकेला दीड कोटी रूपयांचे बक्षीस मिळवून दिले. त्या अधिकाऱ्यांची खुर्ची बदलली. मात्र आपण आहे तसेच आहोत, असा आरोपही त्यांनी नगराध्यक्ष वहाडणे यांचे नाव न घेता केला. देर्डे ते भरवस फाटा ब्राह्मणनाला पुलासह कामांस नाबार्डकडून 3 कोटींची मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)