प्रत्येक कुटुंबापर्यंत पाणी पोहोचवा

कोपरगाव : पाणी पुरवठा मार्गी लावण्यासंदर्भातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामसेवक, सरपंच बैठकीत मार्गदर्शन करताना आशुतोष काळे.

आशुतोष काळे : नळपाणी योजना, वितरण व्यवस्थेतबाबत कोपरगावात बैठक

कोपरगाव  – माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्‍यातील नळ पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव पाठविले, या प्रस्तावांना शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे जवळपास 52 कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आले आहे. या पाणी योजनांचे कामे तातडीने मार्गी लावून वाड्या-वस्त्यांसह प्रत्येक कुटुंबापर्यंत पाणी पोहोचवा, अशा सूचना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांनी दिल्या.

-Ads-

कोपरगाव तालुक्‍यातील सुरेगाव, कोळपेवाडी, मंजूर, शहाजापूर, येसगाव, जेऊर कुंभारी, रवंदे, मळेगाव थडी, कुंभारी, वारी, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, सोयेगाव, वेस, मनेगाव, आदी गावातील नळपाणी पुरवठा योजनांसाठी व वितरण व्यवस्थेसाठी 50 कोटी 83 लाख 75 हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामसेवक, सरपंच यांची संयुक्‍त बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या वेळी ते बोलत होते.

या वेळी आशुतोष काळे यांनी सर्व पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेतला. या योजना तातडीने पूर्ण व्हाव्यात, यासाठी कागद, पत्रांची पूर्तता करा. योजना सुरू करण्यासाठी काही अडचणी आल्यास आपल्याशी संपर्क करावा. या योजनेचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी तातडीने या योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे. पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण कशा होतील यासाठी ग्रामसेवक, सरपंच यांनीही यामध्ये लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी राजेंद्र पंडोरे, मिलिंद भांगरे, पंचायत समिती उपाभियंता उत्तम पवार, अश्‍विन वाघ, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, पंचायत समिती उपसभापती अनिल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)