पाणी जायकवाडीला सोडल्यास जलसमाधी

कोपरगाव – तालुक्‍यातील गोदावरी नदी काठच्या शेतकरी व ग्रामस्थांनी नदीतील साठवलेले पाणी जायकवाडी धरणाकडे सोडल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध करीत कोपरगाव तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत तहसीलदारांना निवेदन दिले.

जलसंपदा विभागाने गोदावरी नदी पात्रातील अडवलेले पाणी पोलीस बंदोबस्तात नदीकाठच्या 9 बंधाऱ्याच्या फळया काढून जायकवाडीला सोडण्याचा निर्णय घेतल्याने कोपरगाव तालुक्‍यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. नदीकाठचे नागरिक विरोध करणार असल्यामुळे पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने वातावरण चिघळले आहे.

दारणा धरणातून जायकवाडीसाठी सोडलेले पाणी तालुक्‍यातील गोदावरी नदीवरील नांदुर मधमेश्‍वरपासून खालच्या भागापर्यंत ठिकठिकाणी बंधाऱ्यामध्ये अडवलेल्या पाण्यावर नदीकाठच्या ग्रामस्थांचा संपुर्ण अधिकार आहे, ते पाणी जायकवाडीला सोडण्यापुर्वी झालेल्या पावसाचे हक्काचे पाणी कोपरगांवसाठीच असून त्या पाण्यावर कोणाचा हक्क नाही, तालुक्‍यावर दुष्काळाची छाया आहे, पाऊस कमी झाल्याने तालुक्‍यात पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून बंधाऱ्यातील पाणी जायकवाडीसाठी सोडल्यास तालुका उध्वस्त होणार आहे.

कोकमठाण, संवत्सर, जेऊर कुंभारी, घारी, कसारे, मुर्शतपूर, हिंगणी, डाऊच बु, चांदगव्हाण, जेऊर पाटोदा यासह अनेक गोदाकाठच्या गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आमच्या डोळयांदेखत हक्काचे पाणी खाली सोडत असाल तर ते आम्ही सोडू देणार नाही, प्रसंगी जलसमाधी घेवू , असा इशारा आंदोलनकांनी दिला आहे. या संदर्भात तहसीलदार, पोलीस स्टेशन, पाटबंधारे विभागास निवेदने देण्यात आली आहेत.

तालुक्‍यात पाण्याची तीव्र टंचाई आहे, एकतर शासनाने पाण्याची भीषण समस्या असतांना दुष्काळी तालुक्‍यात समावेश केला नाही, म्हणून जनतेत चिड निर्माण झाली आहे, त्यात आता जायकवाडीसाठी तेथील नेत्यांच्या अट्टाहासापोटी गोदावरी पट्टयात बंधाऱ्यात साठवलेले पाणी सोडण्यासाठी शासनावर दबाव येत आहे. त्यामुळे तालुक्‍यात प्रक्षुब्ध वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी ग्रामस्थांनी त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे.

गोदाकाठच्या गांवातील लोकांनी शासनाने आमच्या विरोधाचा विचार केला नाही तर जलसमाधी घेवू असा इशारा देण्यासाठी तहसीलदारांचे दार ठोठावले. शासन पातळीवर कुठलीही मदतीसाठी प्रयत्न होतांना दिसत नाही. आज डोळयासमोरून गोदावरीतून पाणी वाहून गेले, उद्या उभी पिके जळतांना, जनावरे, माणसे दगावतांना पहाण्याची वेळ येऊ नये अशी मागणी या ग्रामस्थांची आहे. निवेदनात कायदा व सुव्यवस्था बिघडल्यांस त्याची जबाबदारी शासनावर असल्याची संतप्त भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)