कोळपेवाडी दरोड्यातील सात संशयित ताब्यात

पोलिसांनी हत्यारे, मोबाईल आणि दुचाकी केली हस्तगत

नगर- कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथील दरोड्यात स्थानिक गुन्हे शाखेने संशयावरून सात जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून समजली. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, मोबाईल आणि दुचाकी वाहनेदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या संशयितांनी पोलिसांसमोर गुन्ह्याची माहितीदेखील दिली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याच्या “थिअरी’ची जुळवाजुळव करीत होते. पोलिसांनी संशयितांच्या नावांबाबत गोपनीयता पाळली आहे.

कोळपेवाडीतील मुख्य रस्त्यावर असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावर 19 ऑगस्टला सायंकाळी सात ते आठ जणांनी दरोडा टाकला होता. दोघा सराफांवर दरोडेखोरांनी गोळीबार केला होता. दुकानाचे मालक शाम सुभाष घाडगे (वय 36) यांच्या डोक्‍यात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता, तर त्यांचे बंधू गणेश (वय 42) हे गंभीर जखमी झाले होते. दरोडेखोरांनी दुकानातील लाखो रुपयांच्या सोन्याचांदीचा ऐवज लुटून नेला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. नगर जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकांनी निषेध म्हणून बंद पाळला होता.

पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दरोड्याची ही घटना गांभीर्याने घेतली. दरोडेखोरांच्या शोधासाठी त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत चार पथके तयार केली होती. महाराष्ट्र, झारखंड, उत्तर प्रदेशातील विविध भागात खबऱ्यांमार्फत दरोडेखोरांचा माग काढला जात होता. शेवटी या टोळीचा शोध नगरमध्येच लागला. ही टोळी नेवाशातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी नगरमधूनच फिल्डिंग लावली होती.

या संशयितांमध्ये अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्रासह इतर राज्यातदेखील गुन्हे दाखल आहेत. याच दरोडेखोरांनी शामवर अगदी जवळून गोळी झाडली होती. घाडगे यांच्या डोक्‍यात ही गोळी लागली. ज्याने गोळी झाडली, त्यालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरोडेखोरांनी दुचाकीवरून वेगवेगळे मार्ग बदलत लुटीचा माल नेला. पोलीस त्यांच्या मागावर होते; परंतु पोलिसांना चकवा देण्यासाठी ते घटनेनंतर एका ठिकाणी रात्रभर दबा धरून बसले होते, अशीही माहिती पुढे येत आहे. पोलिसांनी या दुचाकी आणि दरोड्यात वापरलेली हत्यारेदेखील हस्तगत केली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)