कोपरगाव – कोपरगाव तालुक्‍यातील कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स या सराफ दुकानावर दरोडा टाकून 28 लाख रुपये लुटले तसेच गोळीबार करून एकाचा खून केल्याप्रकरणातील टोळी पोलिसांनी उघडकीस आणली असून त्यापैकी आठ जणांना अटक केली आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार कुख्यात दरोडेखोर पपड्या उर्फ संजय उर्फ राहुल व्यंकटी उर्फ महादू उर्फ महादेव उर्फ गणपती काळे (रा. वर्धा) हा प्रमुख असलेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी सूत्रधार पपड्या मात्र अजून मोकाट आहे.

कोपरगाव पोलिसांनी अटक केलेल्या आठ जणांना आज न्यायालयासमोर हजर केले होते. पोलीस कोठडीचा हक्क राखून ठेवत ओळख परेडसाठी आणि गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयीन कोठडीची मागणी पोलिसांनी केली, ती न्यायालयाने मान्य केली. या आठ आरोपींना दिवाणी न्यायाधीश डी पी. कासट यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यात किरण बंडू काळे (वय 23), अजय बंडू काळे (वय 22, रा. साईनाथनगर, नेवासे), राजकुमार नारायण काळे (वय 20, चिखली, बुलडाणा, नेवासे), जितू रामदास भोसले (वय 39, जोगेश्‍वरी, औरंगाबाद), महेंद्र बाबुशा पवार (वय 21, रा. बोरखेड, बीड), विक्रम रजनीकांत भोसले (वय 22, रा. तांबेमळा, व्हीआरडीई, नगर), अक्षय भीमा जाधव (वय 25, कोळपेवाडी, ता. कोपरगाव) व बुच्या रामदास भोसले (वय 43, रा. बागेवाडी, बीड) या आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी सुनील चव्हाण यांचा या टोळीचा छडा लावण्यात मोठा वाटा आहे.

या प्रकरणातील तपासाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आज पत्रकारांना दिली. कोळपेवाडी येथे 19 ऑगस्टला सायंकाळी गणेश सुभाष धाडगे व शाम सुभाष धाडगे यांच्या लक्ष्मी ज्लेवर्स या दुकानावर 21 जणांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकला होता. या दरोड्यात 26 लाख 55 हजारांच्या सोन्या-चांदीचे दागिने दरोडेखोरांनी लुटून नेले होते. या अगोदर टोळीने गावठी पिस्तुलातून गोळीबार आणि परिसरात हातबॉम्ब फोडून दंगलसदृश परिस्थिती निर्माण केली होती. शाम यांच्यावर दरोडेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शाम यांचे बंधू गणेश यांच्यावरदेखील गोळीबार झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले.

भर बाजारपेठेत हा दरोडा पडल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. या दरोडेखोरांच्या कार्यपद्धतीमुळे ही टोळी जुनीच असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. सुनील चव्हाण यांनी खबऱ्यांमार्फत माहिती काढत टोळीचा छडा लावला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची त्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळाले. या टोळीतील 12 जणांचा शोध अजून सुरू आहे.

शर्मा म्हणाले, की या टोळीचा प्रमुख पपड्या हा नुकताच नागपूर कारागृहातून पॅरोलवर सुटला होता. त्याने 2006-2007 साली याच प्रकारचे 37 साखळी गुन्हे केले होते. पॅरोलवर सुटून आल्यानंतर टोळी पुन्हा एकत्र करून कोळपेवाडी येथे दरोडा टाकला. पपड्याविरुद्ध नगर, पूलगाव, यवतमाळ, चंद्रपूर, कमलेश्वर, नागपूर येथे सहा गुन्हे दाखल आहेत. दुसरा आरोपी पप्या उर्फ प्रशांत उर्फ शेंडी रजनीकांत उर्फ राजीकार्या भोसले याच्यावर विविध राज्यांत 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. अजय बंडू काळे याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत.

या तपासात पवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुट्टे, इंगळे, योगेश गोसावी, नाणेकर, चव्हाण, दत्ता हिंगडे, मन्सूर सय्यद, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, रवींद्र कर्डिले, अन्ना पवार आदींनी मोलाची कामगिरी बजावली.

मिनाक्षी काळेने रेकी केल्याचा संशय

कोळपेवाडीसारख्या छोट्या गावात आंतरराज्यीय टोळी दरोडा टाकते. याचा अर्थ त्याबाबतची टीप कोळपेवाडी येथील अक्षय भीमा जाधव याने दिली असावी. जाधव याने या दरोड्यात आरोपींना काय काय मदत केली, याचा कसून तपास सुरू आहे, अशी माहिती तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली. या घटनेतील पपड्या काळेची सून मीनाक्षी काळे हिला दरोडा टाकण्यापूर्वी कोळपेवाडीच्या माहेश्वर मंदिरात भिक्षा मागण्यासाठी ठेवले होते. तिनेच या घटनास्थळी रेकी केली असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)