कोल्हारच्या पुलाला पाच वर्षांतच भगदाड

नगर-मनमाड रस्त्यावर वाहनांच्या सात-आठ किलोमीटरच्या रांगा

कोल्हार खुर्द – राहुरी तालुक्‍यातील कोल्हार खुर्द येथे प्रवरा नदीवर असलेल्या नवीन पुलाला दीड वर्षांनंतर पुन्हा भगदाड पडले आहे. या पुलाचे काम अचानक आठवडे बाजाराच्या दिवशी हाती घेतल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. प्रवरा नदीच्या दोन्ही बाजूला नगर-मनमाड रस्त्यावर सात-आठ किलोमीटरपर्यंत वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे ग्रामस्थांसह वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता.

प्रवरा नदीवरचा गेल्या तीस-पस्तीस वर्षांपूर्वी बांधलेला पुल जुना झाला. या पुलावरच्या भिंतीला तडे गेले. नगर-मनमाड रस्ता उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावरून होणारी वाढती वाहतूक लक्षात घेता गेल्या सहा वर्षांपूर्वी याच पुलाला समांतर असा नवीन पूल बांधण्यात आला. नगर-कोपरगाव रस्त्याचे काम करणाऱ्या सुप्रीम एंटरप्रायझेस या कंपनीने रस्त्याचे जसे निकृष्ट काम केले. तसेच रस्त्यांवरील पुलाचेही काम निकृष्ट केले. पाच वर्षांपूर्वी नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला; परंतु नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न या म्हणीप्रमाणे या पुलाचे बांधकाम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले.

पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पुलाला दीड वर्षांपूर्वी मोठे भगदाड पडल्याने हा पूल वाहतुकीसाठी काही दिवस बंद करण्यात आला होता. यंदाच्या रिमझिम पावसामुळे या पुलावरील डांबरीकरणाचा थर वाहून गेला. त्यामुळे लोखंडी गज उघडे पडले. या पुलाचे काम केलेल्या सुप्रीम कंपनीने दुरुस्तीचे काम आणि ऐन आठवडे बाजारच्या दिवशी हाती घेतले. दुपारच्या वेळी हाती घेतलेले काम संध्याकाळपर्यंत होऊ न शकल्याने वाहतूक पुलापासून लांबच लांब ठप्प झाली होती. कोल्हार बुद्रुक येथे आज आठवडे बाजारच्या गर्दीत मोठी भर पडली.

या परिसरातील वाहतूक बेलापूरमार्गे वळविण्यात आली. कोल्हार खुर्दच्या बाजूने पुलापासून आठ-दहा किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रंगा लागल्या होत्या. याच मार्गावर शिर्डी-शिंगणापूरसारखे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळे असल्याने भाविकांना या निकृष्ट कामाचा मोठा त्रास सहन करावा लागला. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरदेखील या पुलावरून जाणारी वाहतूक पूर्ववत होण्यासाठी किमान सहा दिवस लागणार असल्याचे सुप्रीम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोट्यवधी रुपये भगदाडात

गेल्या पस्तीस वर्षांपूर्वीचा जुना पूल आजही तग धरून उभा आहे; मात्र पाच वर्षांपूर्वी बांधलेला पूल दोन वेळा भगदाड पडून नादुरुस्त झाला. त्यातून सुप्रीम कंपनीने केलेल्या निकृष्ट कामाचा नमुना पुढे आला. या पुलासाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये भगदाडात गेले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)