प्रवरा नदीवरील नवा पूल 15 दिवसांनंतरही नादुरुस्तच

कोल्हार खुर्द (ता. राहुरी) : येथील नव्या पुलावर सुरू असलेले दुरुस्तीचे काम. (छाया : प्रकाश चिखले)

कोल्हार खुर्द – नगर-मनमाड राज्यमार्गावरील प्रवरा नदीवरील पूल पंधरा दिवसानंतरही नादुरुस्तच आहे. त्यामुळे दुतर्फा वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. एकूणच पूल दुरुस्तीचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे स्पष्ट होते. नगर-मनमाड राज्यमार्ग नगर दक्षिण हा उत्तरेशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीची धार्मिकस्थळे शिर्डी, शिंगणापूर यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे.

गेल्या पाच, सहा वर्षांपूर्वी प्रवरा नदीपात्रावर उभारण्यात आलेल्या नवीन पूलाला गेल्या पंधरा दिवसापूर्वी भगदाड पडले होते. त्यामुळे अवजड वाहतूक वळविण्यात आली. पंधरा दिवसांचा कालावधी लोटूनही हा पूल वाहतुकीसाठी नादुरुस्तच होता. पुलाच्या दोन्ही बाजूने वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे.

कोल्हार खुर्द येथील प्रवरा परिसरात गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या रिमझिम पावसानेच पुलावरील डांबराचा थर वाहून गेला. पुलाला दिलेल्या जोडाच्या जागेवरील डांबर निघून गेल्यामुळे जोड उघडे पडले. पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक बनला. याची दखल घेत पुलाची बांधणी करणाऱ्या सुप्रीम कंपनीने गेल्या 31 ऑगस्ट रोजी ऐन आठवडे बाजारच्या दिवशी पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आणि कोल्हारमधून जाणाऱ्या वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.

एकाच पुलावरून होणारी दुहेरी वाहतूक यामुळे पूर्णपणे विस्कळीत झाली होती. कोल्हार खुर्द आणि बुद्रुकच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी हाती घेतलेले काम संध्याकाळपर्यंत पूर्ण न झाल्याने अखेर गेल्या तीन ते चार वर्षांपासून वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असलेल्या जुन्या पुलावरून कंपनीने चारचाकी वाहनांना जाण्यासाठी जागा करून दिली. कशीबशी या ठिकाणांवरील वाहतूक रात्री उशीरा कमी झालेली दिसली.

नवीन पुलाची दुरुस्ती होऊन 6 दिवसांत पूल वाहतुकीसाठी पूर्ववत खुला करण्याचे त्यावेळी सुप्रीम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र या आश्‍वासनाला तब्बल 15 दिवसांचा कालावधी लोटला. तरीही पुलावर असलेले काम पूर्णपणे व्यवस्थित झाले नाही. आजही हा पूल अवजड वाहतूक आणि दोन्ही बाजूने होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी मोठा अडथळा ठरत आहे.

त्यामुळे पुलावरील वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करावी, पुलाच्या समांतर असणाऱ्या जुन्या पुलाचे काम पूर्ण करावे, अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या पुलावरून दुचाकी, शाळकरी विद्यार्थ्यांची नेहमी गर्दी असल्याने धोकादायक बनलेल्या या पुलावरून होत असलेली चारचाकी वाहतूक बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)