अवजड वाहतुकीने केडगावमध्ये घेतले दोघांचे बळी

पादचारी आणि महाविद्यालयीन मुलीचा मृत्यू : नागरिकांचे अपघातानंतर रास्ता रोको

केडगाव – अवजड वाहतुकीने आज केडगावमधील दोघांचा बळी घेतला. हे अपघात वेगवेगळ्या वेळी झाली असून, त्यात पादचारी तरुणाचा, तर एका महाविद्यालयीन मुलीचा समावेश आहे. अंबिकानगर बसस्थानकाजवळ कल्याण विठ्ठल अनभुले (वय 60, रा. घुमरी टाकळी) आणि महाविद्यालयीन मुलगी अनामिका अविनाश गायकवाड (रा. शाहूनगर, केडगाव) अशी अपघातात बळी गेलेल्या दोघांची नावे आहेत. या अपघातानंतर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सण-उत्सवात नगर शहरातून अवजड वाहतूक का, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी अवजड वाहतूक शहराबाहेर वळविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

-Ads-

शहरातून गेल्या काही दिवसांपासून अवजड वाहतूक सुरू आहे. सण-उत्सवाचा काळ असल्याने शहरातून जात असलेल्या महामार्गावर वर्दळ वाढली आहे. नवरात्रोत्सवामुळे शहरातील वेगवेळ्या धर्मपीठांत भाविकांची गर्दी होत आहे. याच काळात रस्त्यावर अवजड वाहनाने दोघांचा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये जिल्हा पोलीस दल आणि प्रशासनाविषयी संतप्त अशी प्रतिक्रिया उमटत आहेत. गुरूवारी पहाटे पाज वाजता अंबिकानगर बसस्थानकाजवळ अपघात झाला. वाहनाच्या धडक दिल्याने विठ्ठल अनभुले यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघातून केडगाव सावरत नाही, तोच तीन तासाने केडगाव वेशीजवळ महाविद्यालयीन मुलगी अनामिका अविनाश गायकवाड हिचा अवजड वाहनाने धडक बसली. यात तिला तिचा जीव गमवावा लागला.

एका पाठोपाठ अपघात होत असून देखील महामार्ग वाहतूक पोलीस आणि शहर वाहतूक पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटली. नागरिक रस्त्यावर एकत्र येऊन महामार्ग वाहतूक पोलीस आणि शहर वाहतूक पोलिसांविरोधात आंदोलन सुरू केले. जिल्हा पोलीस दलाविरोधात घोषणाबाजी सुरू केली.

शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या आंदोलनात ते सहभागी झाले. ते म्हणाले, शहरातून अवजड वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. बायपास रस्ता दुरुस्ती होत नसल्याने ही वाहतूक पोलिसांकडून शहरात वळवली जात आहे. महामार्गालगत असलेल्या शहरातील आणि उपनगरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सण-उत्सवाच्या सुरूवातीला दोघांचे बळी गेले आहेत. याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शहरातून जाणारी अवजड वाहतूक कोणत्याही परिस्थिती बंद झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली. शहर पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली. अवजड वाहतूक शहराबाहेरून वळविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)