काष्टीतील जुगार अड्ड्यांवर लाखोंची उलाढाल

पोलीस प्रशासनाने कारवाई करावी : ग्रामस्थांसह जयहिंद फाउंडेशनची मागणी

श्रीगोंदे – जनावरांचा राज्यातील सर्वांत मोठा बाजार भरणाऱ्या काष्टीमध्ये सुरू असलेल्या चार ते पाच जुगार अड्ड्यांवर दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. तालुक्‍याची आर्थिक राजधानी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या काष्टीचे नाव बदनाम करणाऱ्या जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ आणि जयहिंद फाउंडेशनने केली आहे.

तालुक्‍यातील काष्टी गाव जनावरांच्या बाजारासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. त्याशिवाय माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे गाव अशीही काष्टीची एक वेगळी ओळख आहे. काष्टीच्या जनावरांच्या बाजारात प्रत्येक आठवड्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. सध्या मात्र काष्टीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांमुळे काष्टीचे नाव चर्चेत आले आहे. काष्टीत सध्या चार ते पाच जुगारअड्डे सुरू असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार करण्याचे व तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणार असल्याबाबतचे आवाहन श्रीगोंदा पोलिसांनी केले आहे. सोशल मीडियावर काष्टीतील जुगार अड्ड्यांवरील लाखोंच्या उलाढालीची चर्चा रंगत आहे, मात्र अद्याप पोलिसांनी कोणतीही तक्रार आली नसल्याचे समजते.

काष्टीतील आलिशान हॉटेल्समध्ये जुगारअड्डे रंगत असल्याचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात एका जुगार अड्ड्यावर एकाच रात्री तब्बल सत्त्याऐंशी लाखांची उलाढाल झाल्याचा या पोस्टमध्ये उल्लेख आहे. नाशिकसारख्या बड्या महानगरातून पैसेवाले जुगार खेळण्यासाठी येत असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. काष्टीतील जुगार अड्ड्यांविषयी नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे; मात्र पोलीस प्रशासनाने स्वयंस्फूर्तीने काष्टीतील लाखोंची उलाढाल होणाऱ्या जुगार अड्ड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी काष्टी ग्रामस्थांकडून होत आहे.

पोलीस निरीक्षकांना निवेदन देणार -पाचपुते

काष्टी येथे चार ते पाच जुगार अड्डे सुरू आहेत. या जुगार अड्ड्यांच्या चालकांना गावातील बड्यांचा आशीर्वाद असल्याने त्यांची मुजोरी वाढत चालली आहे. श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना निवेदन देऊन काष्टीतील जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे जयहिंद फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)