टंचाईच्या झळांनी बहिरोबावाडीकर त्रस्त 

सरपंच विजय तोरडमल यांच्या स्वखर्चातून पाण्याचे टॅंकर सुरू

कर्जत – तालुक्‍यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. बहिरोबावाडी येथे भीषण पाणी टंचाईमुळे ऐन पावसाळ्यातच टॅंकर सुरू करण्याची वेळ आली आहे. तहसीलदारांकडे टॅंकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र टंचाई घोषित नसल्याचे कारण सांगत टॅंकर मिळू शकला नाही. अखेर सरपंच विजय तोरडमल यांनी पुढाकार घेत सामाजिक भावनेतून दोन टॅंकरद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरू केला आहे.

पावसाळा कोरडाच गेल्याने कर्जत तालुक्‍यात टंचाईचे सावट आहे. पाण्याच्या अभावामुळे शेतातील पिके जळून चालली आहेत. नाले, बंधारे, तलाव असे पाण्याचे सर्वच स्रोत कोरडेठाक पडले आहेत. बहिरोबावाडी येथे जूनपासूनच पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. गावासाठी संजीवनी ठरत असलेला बहिरोबावाडीचा तलाव कोरडा असल्याने त्याखालील पाणीपुरवठा विहिरीला पाणीही नाही. त्यामुळे नळपाणीपुरवठा जूनमध्येच बंद पडला. तलावात उपलब्ध असलेले पाणी आसपासच्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी उपसल्याने टंचाई अधिकच तीव्र झाली.

पाण्यासाठी महिलांना दाही दिशा फिरावे लागत असल्याने दोन टॅंकर सुरू करण्यात आले. सुपे येथे हे टॅंकर भरले जात असून बहिरोबावाडी तसेच वाड्या-वस्त्यांवर सध्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या टॅंकरमुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.तीन जुलैपासून गावात टॅंकर सुरू करण्यात आलेले आहेत. यासाठी कोणताही निधी उपलब्ध नसल्याने स्वखर्चातून हे काम सुरू आहे.

तहसीलदारांकडे टॅंकरचा प्रस्ताव – तोरडमल

टॅंकर सुरू करण्यासाठी जुलैमध्येच प्रस्ताव तयार करून तहसीलदारांकडे सुपूर्द केला आहे. मात्र टंचाई घोषित झाली नसून तसे आदेश प्राप्त झाले नसल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली. त्यामुळे सध्या दररोज दोन-अडीच हजार रुपये खर्च करून ग्रामस्थांच्या सोयीसाठी टॅंकर सुरू ठेवले आहेत, बहिरोबावाडीचे सरपंच विजय तोरडमल यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)