‘जायकवाडी’स पाणी न सोडण्यासाठी याचिका

बिपिन कोल्हे यांची माहिती : पाटपाणी संघर्ष समितीचा पुढाकार

कोपरगाव – ऊर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे आहे. त्यातून जायकवाडीला 6 टीएमसी पाण्याची गरज असताना नऊ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नगर-नाशिक जिल्ह्यांत आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावणार आहे. खरीप पिके गेल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा विचार करून शासनाने जायकवाडीला पाणी सोडू नये, अशी मागणी करणारी याचिका गोदावरी कालवे पाटपाणी संघर्ष समिती व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपिन कोल्हे व शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोल्हे म्हणाले, औरंगाबाद येथील मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याचा आधार घेऊन, 2013 रोजी जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर संजीवनीतर्फे बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाटपाण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

त्याचा निकाल 19 सप्टेबर 2014 रोजी न्यायमूर्तींनी दिला व तुटीच्या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात पश्‍चिमेचे पाणी वळवावे, जायकवाडी धरणात हायड्रोलिक डाटाद्वारे पाण्याची निश्‍तिती करण्यात यावी, किती बेकायदा पाणीसाठा उचलला जातो व संबंधितांवर काय कारवाई केली, दुष्काळाची व्याख्या नेमकी काय, त्याबाबतचे नियम तयार करावे व त्याची माहिती सहा महिन्यांत न्यायालयास द्यावी, असा आदेश मुंबई येथील जलसंपत्ती प्राधिकरण व जलसंपदा विभागांना दिले होते. पण त्यावर नेमकेपणाने कार्यवाही होताना दिसत नाही.

असे असतानाही आता तुटीच्या खोऱ्यात गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अभय कोहरीकर व जलसंपत्ती प्राधिकरणाचे बक्षी जायकवाडीसाठी पाणी सोडा म्हणून अव्यवहार्य आदेश करीत आहेत. त्यासाठी ऍड. प्रमोद पाटील यांच्यामार्फत जनहितयाचिका दाखल करण्यात आली आहे.

बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकऱ्यांचे 2012 पासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिणामी येथील कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात येईल, हे लक्षात घ्यावे, असे सांगून पाण्याच्या लढाईसाठी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेण्यात येईल, असे कोल्हे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)