शेतकऱ्यांचा विरोध झुगारून बंधाऱ्यातील पाणी जायकवाडीला

कोल्हार खुर्द - आर्वतावेळी बंधाऱ्यात साठवलेले पाणी शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही जायकवाडी धरणात सोडण्यात आले.

कोल्हार खुर्द – तालुक्‍याच्या उत्तरेकडील व राहाता आणि श्रीरामपूर तालुक्‍याच्या दक्षिणेकडील परिसराचा तारणहार असलेल्या प्रवरा नदीपात्रात प्रमाणापेक्षा जास्त साठवण्यात आलेल्या बंधाऱ्यांमधील पाणी अखेर उपविभागीय अधिकारी थॉमस मामेन, शाखा अभियंता संजय गणेश, माडीवाले एन. एम. यांच्या पथकामार्फंत कोल्हार खुर्द, कोल्हार बुद्रुक आणि परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध झुगारून सोडण्यात आले

प्रवरा नदीपात्रात आश्वी ते गळनिंब या दरम्यान सहा बंधारे आहेत, यामध्ये आश्‍वी, चणेगाव, रामपूर, कोल्हार, मांडवे, गळनिंब यांचा समावेश होतो. त्यामुळे प्रवरा परिसरातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून विखे पाटील कारखान्यांमार्फत पाणी अडविले जाते, त्यामुळे या परिसरातील शेतकरीवर्गाला याचा नेहमीच फायदा होत असतो. परंतु यंदा पावसाने दडी मारल्याने जायकवाडी धरणासाठी भंडारदरा धरणातून 3.85 टीएमसी पाणी सोडण्यात आले होते, हे पाणी जायकवाडीला जाणे बंधांकरक होते, त्यानुसार प्रवरा पात्रातील सर्व बंधाऱ्यांच्या फळ्या काढून सदर पाणी जायकवाडीसाठी झेपावत होते.

त्यानुसार निळवंडे धरणातून सुटलेले आवर्तन सोमवारी (दि. 26) सकाळी सहा वाजता बंद करण्यात आले, त्यांनतर नदीपात्रातून वाहत असलेले अटीचे पाणी नदी पात्रातील बंधारे यासाठी राखीव, आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे असते, त्यानुसार विखे कारखान्यामार्फ़त आश्वी ते गळनिंब असे सहा बंधाऱ्यांमध्ये 7 ते 8 फळ्या टाकून अडवण्यात आले होते, त्याचप्रमाणे गळनिंबच्या पुढील पात्रामध्ये, बंधाऱ्यावर 9 फळ्या टाकून पाणी अडविण्यात आले होते.

परंतु शासन आदेशानुसार आज अचानक बंधाऱ्यामध्ये पाच फळ्यांपेक्षा जास्त असलेले पाणी जायकवाडीला सोडण्यासाठी अहमदनगर येथील पाटबंधारे विभागाचे उपविभागीयअधिकारी थॉमस मामेन यांचे पथक अधिकाऱ्यांसह प्रवरा पात्रात दाखल झाले. प्रवरा कारखान्याच्यावतीने कारखान्याचे इस्टेट मॅनेजर प्रकाश खर्डे, कोल्हार खुर्दचे सरपंच प्रकाश पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष रामनाथ शिरसाठ, विखे कारखान्याचे सिव्हिल इंजिनिअर गणेश पावडे यांनी ग्रामस्थांसह पाणी सोडण्यास विरोध दर्शवला.

यावेळी प्रवरा कारखान्याचे इस्टेट मॅनेजर प्रकाश खर्डे म्हणाले की, जायकवाडी साठी 3.85 टीएमसी पाणी सोडणे गरजेचे असताना आतापर्यंत ओझरपासून जायकवाडी पर्यंत 4.90 टीएमसी पाणी दाखल झाले आहे. सध्या पात्रात असलेले शिल्लक पाणी हे आमच्या हक्काचे पाणी आहे. त्यामुळे हे पाणी आम्ही सोडू देणार नाही. मात्र उपस्थित ग्रामस्थ व अधिकाऱ्यांचा विरोध झुगारून आलेल्या पथकाने आपले काम पूर्ण करत बंधाऱ्यामध्ये लावण्यात आलेल्या फळ्या काढून प्रवरा परिसरातील शेतकऱ्यांचे राखीव असलेले पाणी सोडून दिले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)