भंडारदरा धरणातून निळवंडेत पाणी सोडण्यास प्रारंभ

जायकवाडीला निळवंडेतून रविवारी सोडणार पाणी : धरण परिसरात दक्षतेसाठी पोलिसांची नियुक्ती

अकोले – मुंबई उच्च न्यायालयात नाशिकच्या आ. देवयानी फरांदे यांच्या पाणी बचाव कृती समितीने जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास स्थिगिती द्यावी, अशी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने आवर्तनाला स्थगिती देण्यास नकार देत, ही याचिका फेटाळली. त्यामुळे जायकवाडी आवर्तनाचा तीढा सुटला आहे. रविवारी (दि. 28) जायकवाडीचे आवर्तन सोडले जाणार आहे. किमान 6 ते कमाल 7 हजार क्‍युसेकने हे आवर्तन सुरू होईल व कमाल 3.85 टीएमसी पाणी निळवंडेतून व 1.90 टीएमसी पाणी मुळा धरणातून सोडले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. पोलिसांनी दक्षतेचा उपाय म्हणून फौजफाटा जमविण्यास सुरुवात केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी जायकवाडी आवर्तनाला विरोध करण्यासाठी पाणी बचाव सर्व पक्षीय संघर्ष समितीची स्थापना केली होती. या समितीने थेट मुंबई उच्च न्यायालयात जायकवाडी आवर्तनाला आव्हान दिले होते. पण तेथे ही याचिकाच फेटाळली गेली. तसेच आवर्तना विरोधात अद्याप कोणी गेले नाही, असे आजच्या घडामोडी पाहता दिसते. त्यामुळे या आवर्तनाला कोणीही अडथळा उभा करू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. ही बाब ध्यानी घेऊन रविवारी आवर्तन सोडण्याच्या दृष्टीने आज सकाळी भंडारदरा धरणातून सकाळी 9 वाजता 3 हजार 800 व दुपारी दोन वाजेनंतर 5 हजार क्‍युसेकचा विसर्ग सोडला जात आहे. रविवारी सकाळपर्यंत निळवंडे धरण ‘ओव्हर फ्लो’ होईल. त्यानंतर धरणाच्या भिंतीवरून व टनेलद्वारे किमान 6 व कमाल 7 हजार क्‍युसेकचा प्रवाह प्रवरा नदीत सोडला जाणार आहे.

सद्या रब्बीचे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे प्रवरा नदी ते ओझर या भागातून नदीपात्र ओले असल्याने पाण्याचे वहन वेगाने होईल. पाण्याचा व्यय होणार नाही. मात्र नदीकाठी पाणी विसर्ग वाढल्याने दक्षता म्हणून सतर्कतेचा इशारा देण्यात येणार आहे. निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत प्रवरा नदीतील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे ‘निडल’ काढले जाण्याची प्रक्रिया सुरू राहील. रविवारपासून जायकवाडी आवर्तन सुरू झाल्यावर मात्र प्रमुख 15 ठिकाणी पोलीस तैनात केले जाणार आहेत. हा बंदोबस्त आवर्तन सुरू असेपर्यंत नदीकाठी मुक्कामी राहणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी घराबाहेर राहणार हेही नक्की.

आज भंडारदरा धरणात आवर्तन सोडतेवेळी 9600 व निळवंडे धरणात 6600 दलघफू पाणी शिल्लकी होते. म्हणजे 16 टीएमसी पाणी साठ्यापैकी सुमारे 4 टीएमसी पाणी जायकवाडीला गेल्यावर दोन्ही धरणांचा मिळून किमान 11 टीएमसी पाणीसाठा शिलकी राहणार आहे. त्याचे योग्य नियोजन करणे हे जल संपदा विभागाला आगामी काळात आव्हान ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)