तहसीलदार हल्ला प्रकरणातील चार आरोपी गजाआड

जामखेड – तालुक्‍यातील धनेगाव येथे अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्या प्रकरणातील फरार चार आरोपींना पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली. आज न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली.

धनेगाव शिवारातील खैरी नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा होत असल्याची खबर दि. 11 रोजी रात्री दहाच्या सुमारास महसूल विभागाचे कामगार तलाठी शिवाजी हजारे, विकास मोराळे, प्रशांत कांबळे यांना मिळाल्यानंतर हे तिघेजण धनेगांव शिवारातील खैरी नदीपात्रात गेले असता त्या ठिकाणी अवैध वाळूचा उपसा करताना आढळले. यानंतर तहसीलदार विशाल नाईकवाडे हे देखील त्या ठिकाणी आले.

त्यांना महसूल कर्मचाऱ्यांनी प्रतिबंध केला असता वाळू तस्कर महेश शिंदे (रा.चिंचपूर ता.परांडा जिल्हा उस्मानाबाद), अमित देशमुख, दादा काळे, योगेश काळे (सर्व रा.धनेगाव) व इतर अनोळखी पाच जणांनी यांनी लाकडी दांडके घेऊन शिवीगाळ केली व तुम्ही येथून चालते व्हा नाही तर तुमचे मुडदे पाडू, अशी धमकी दिली. तलाठी शिवाजी हजारे यांच्यासह तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्यावर सशस्त्र हल्ला केला होता. या घटनेत तलाठी हजारे जखमी झाले होते.

या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते. यानंतर जामखेड पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार हे आरोपी उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्‍यातील चिंचपुर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, पोलीस कर्मचारी एस. ए. जाधव, एम. एम. साखरे, विजय कोळी, गणेश साने, नवनाथ भिताडे, चालक राहुल सपट यांच्या पथकाने गुरुवारी पहाटे त्या ठिकाणी छापा टाकून हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भागवत देशमुख, (वय 19), योगेश बबन काळे, (वय 22), दादा बबन काळे (वय 25 रा.धनेगाव, ता जामखेड) व महेश अंकुश शिंदे (वय 23, रा.चिंचपूर.ता.परांडा) या चार जणांना अटक केली. त्यांना जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चौघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)