जमिनीतील पाण्याची पातळी खालावली : शेतकरी मोठ्या संकटात
जवळा – नोव्हेंबर महिन्यातच तालुक्यात दुष्काळाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. विहिरी आणि बोअर (कुपनलिका) कोरडे पडल्यामुळे पाण्याअभावी शेतात उभी असलेली पिके जळून चालली आहेत. याचाच फटका जवळा परिसरातील शेतकऱ्यांना बसू लागला असुन परिसरातील ऊसदेखील पाण्याअभावी जळू लागला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
जामखेड तालुक्यातील पूर्वीपासूनच पाण्याचे कसलेच मोठे स्त्रोत नसल्याने उसाची लागवड कमी आहे. तालुक्यातील खर्डा व जवळा परिसरात सहा हजार हेक्टर उसाची लागवड केली आहे. सध्या पावसाने दगा दिल्याने यावर्षी पाहीजे तेव्हढे उत्पन्न निघणार नाही. तसेच सध्या जमिनीतील पाण्याची पातळी खालावली असल्याने उसाला पाणी कोठून द्यायचे असाच प्रश्न शेतकऱ्यांना पडला असुन ऊस सुकू लागल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने चारा म्हणून विक्री करावी लागली आहे.
पाणी टंचाईचा फटकादेखील रब्बीच्या पीकांनादेखील बसू लागला आहे. यंदा शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी ज्वारीची पेरणी केली, त्या ठिकाणी पावसाने पाठ फिरविल्याने ती पीकेदेखील जळून चालली आहेत. या वर्षी पाऊस नसल्याने रब्बीच्या ज्वारीचा 50 टक्के पेरा घटला आहे. परिसरात भयानक दुष्काळी परिस्थितीमुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे गुरांना बाजारात मातीमोल भावाने विकावे लागत आहे. वर्षभर कसे सांभाळायचे त्यांना चारा पाणी कोठून आणावयाचा की, जनावरे विकून मोकळे व्हावे असा विचार बहुतेक शेतकरी करू लागले आहेत.
अनेक लोकांनी तर चार सहा महिन्यासाठी गाव सोडून बाहेर स्थलांतर केले आहे. यामुळे काही गावेची गावे ओस पडू लागली आहेत. एक महिन्यानंतर तर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होईल. परिसरात नोव्हेंबर महिन्यातच कडक उन्हाळा जाणवू लागला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा