पालकमंत्र्यांकडून महावितरणचे अधिकारी ‘लक्ष्य’

जामखेड तालुका दुष्काळ परिस्थितीची पहाणी : टंचाई आढावा बैठकीत दिल्या सूचना

तुमची डिग्री तपासावी लागेल

आपणास सिंगल फेज व थ्री फेज यातील फरक कळत नसून, सिंगल फेज ग्राहकांचे कनेक्‍शन का कट केले? कट करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. याचे समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांना देता न आल्याने संतप्त झालेल्या पालकमंत्र्यांनी, मला तुमची डीग्रीच तपासावी लागेल, असे म्हणत महावितरण अधिकाऱ्यांच्या डीग्रीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

जामखेड – खरीप हंगामासह रब्बी हंगामदेखील वाया गेला आहे. दुष्काळाची कामे, पाणीटंचाई नियोजन व पशुधन वाचण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मात्र टंचाई काळात महावितरणच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने पालकमंत्री यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यातील दुष्काळी भागातील खांडवी व सारोळा येथे रविवारी सकाळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पहाणी केली. यानंतर जामखेड पंचायत समितीमध्ये टंचाई स्थितीचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, कार्यकारी अभियंता मासाळ, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एल. बी. भांगरे, पशुसंवर्धन जिल्हाधिकारी डॉ. सुनिल तुमारे, जिल्हाकृषी अधीक्षक पंडीत लोणारे, उपविभागीय जिल्हा अधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी अशोक शेळके, तालुका कृषी अधिकारी दीपक शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती सूर्यकांत मोरे, पंचायत समिती सदस्य डॉ. भगवान मुरूमकर, नगराध्यक्ष निखिल घायतडक, उपाअध्यक्ष शाकीर खान, खर्डा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या वंदना अनिल लोखंडे आदी अधिकारी, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

पुढे पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी महावितरण विभागासंदर्भातील केलेल्या प्रश्‍नांना समाधानकारक उत्तरे देता न आल्यामुळे उपअभियंता योगेश कासलीवाल व संतोष सांगळे यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच टंचाईस्थिती घोषित केलेल्या गावांतील पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्‍शन तोडले जाणार नाही. याबाबत त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनादेखील सूचना दिल्या.

दुष्काळावर मात करण्यासाठी विविध यंत्रणांसोबतच सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. जनतेला दिलासा देण्यासोबतच पशुधन वाचविण्यासाठी पाणी व चाऱ्याचे नियोजन आतापासून करण्यात यावे, जनतेला गरजेनुसार पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी टंचाईग्रस्त गावात टॅंकरचे योग्य नियोजन करावे, मागणीनंतर तीन दिवसांत काम उपलब्ध करुन द्यावे, दुष्काळी स्थितीत एकत्रित व समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.

तालुक्‍यात खरीप व रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. शासन शेतकऱ्यांना मदत करणार असून, पशुधन वाचविण्यासाठी मंडळनिहाय चारा नियोजन करा. बोंडअळी संदर्भात अनुदानापासून शेतकरी वंचित राहणार नाही, अशी हमीदेखील पालकमंत्री शिंदे यांनी आढावा बैठकीत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)