दोन दिवसीय इज्तेमाची उत्साहात सांगता

लाखभर मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत नमाज व दुवा अदा

नेवासे – नेवासे येथील काझीनगरच्या प्रांगणात झालेल्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय इज्तेमाची सामुदायिक विवाह सोहळ्यासह नमाज व दुवा अदा करून लाखभर भाविकांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.3) रात्री उत्साहात सांगता करण्यात आली. देशाच्या एकता अखंडता अबाधित राहण्यासाठी व देशाला उन्नतीकडेने नेण्याकरिता अल्लाहतालाकडे दुआद्वारे प्रार्थना करण्यात आली. शुक्रवारी (दि.2) इज्तेमाच्या पहिल्या दिवशी सुमारे सत्तर हजार भाविकांनी येथे हजेरी लावली तर शनिवारी (दि.3) शेवटचा दिवस असल्याने सकाळी फजरची नमाज अदा करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी मालेगाव येथील मौलाना हाजी लाईक यांनी बयान पेश केला तर दुपारी 1.30 वाजता जोहर नमाज व त्यानंतर असर नमाज झाली मुब्रा येथील मौलाना शोएब यांच्या बयाननंतर जिल्ह्यातील आलेल्या वीस जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

शनिवारी सायंकाळी मगरीबची नमाज हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. नांदेड येथील मौलाना साद अब्दुल्ला यांच्या उपस्थितीत झालेल्या या नमाजसाठी हजारो भाविकांचा जनसागर लोटला होता. काझीनगरचे प्रांगणातील मंडपाबाहेर बसून भाविकांनी नमाज अदा केली. इज्तेमाची सांगता जमाते तबलीकचे महाराष्ट्र प्रमुख मौलाना हाफिज मंजूर साब यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी देशाला उन्नतीला जाऊ दे, देशाची एकता व अखंडता मजबूत होऊ दे,भाईचारा नांदावी या करीता दुवा मागण्यात येऊन सांगता करण्यात आली.

दोन दिवशीय इज्जतेमा शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी नेवासा येथील मुस्लिम समाजातील सुमारे दोनशे युवा कार्यकर्ते, स्वयंसेवक एक महिन्यापासून मेहनत घेतांना दिसत होते. या इज्तेमाकरीता सर्वधर्मीय बांधवांनी देखील खारीचा वाटा उचलून योगदान दिले.

या दोन दिवसाच्या इज्तेमाला आमदार बाळासाहेब मुरकुटे, युवा नेते प्रशांत गडाख, राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग अभंग, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब पवार, त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे साहेबराव घाडगे, कडूभाऊ काळे, कॉंग्रेस कमिटीचे तालुका शहराध्यक्ष संजय सुखधान यांनी भेटी देऊन कार्यक्रमाची माहिती घेतली.

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. इज्जतेमासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे संयोजन समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)