आयकॉन स्कूलच्या संचालकांची जिल्हाधिकाऱ्यांना अरेरावी

कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

आयकॉन’च्या बांधकाची चौकशी सुरू

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि अधिकारी आयकॉन स्कूलमध्ये गेले असताना स्कूलचे संचालक राणा यांनी त्यांच्याशी चांगलीच हुज्जत घातली. विशेष म्हणजे, द्विवेदी यांना बंदुकधारी पोलीस अंगरक्षक असताना देखील राणा हे त्यांच्या दिशेने आक्रमक होते. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी संचालकांच्या हुज्जतिची दखल घेत स्कूलच्या बांधकामाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राणा यांच्यासमोरच हे आदेश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशामुळे स्कूलच्या इमारतीविषयी अनेक बाबी समोर येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

नगर – महापालिका निवडणुकीसाठी स्टेशन रोडवरील आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये मतदान केंद्रासाठी जागा उपलब्ध होऊ शकते का, हे पाहण्यासाठी गेलेले जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना स्कूलच्या प्राचार्यांनी अडवित हुज्जत घातली आहे. जिल्हाधिकारी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत उपायुक्त प्रदीप पठारे यांनी त्यांच्या आदेशावरून पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे. कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

महापालिकेसाठी नऊ डिसेंबरला मतदान होत आहे. त्यासाठी मतदान केंद्र उपलब्ध करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवडणूक शाखेच उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, उपायुक्त प्रदीप पठारे, शहर अभियंता विलास सोनटक्के, उपअभियंता कल्याण बल्लाळ हे यातूनच स्टेशन रस्त्यावरील आयकॉन पब्लिक स्कूलच्या तपासणीसाठी गेले होते. परंतु आयकॉनचे संचालक राणा यांनी शाळेच्या आवारात विनापरवानगी कसा प्रवेश केला म्हणून या अधिकाऱ्यांची अडवणूक केली. याचा जाब ते विचारू लागले. काही अधिकाऱ्यांनी पुढे होत राणा यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. राणा हे चढ्या आवाजात अधिकाऱ्यांवर रुबाब झाडत राहिले.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनीही राणा यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. राणा यांनी त्यांच्याशीही वाद घातला. द्विवेदी आणि राणा यांच्यात यावेळी चांगलीच खडाजंगी झाली. यानंतर हे अधिकारी मागे फिरले. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. उपायुक्त प्रदीप पठारे यांनी याप्रकरणी कोतवाली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)