नगर शहरात हेल्मेटची कारवाई सुरू; नागरिकांमध्ये असंतोष

मनसेचा हेल्मेटला विरोध

“हेल्मेट सक्ती’ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. शहरातील सिग्नल व्यवस्था, अवजड वाहतूक, रस्त्यांची दुरवस्था असताना सुरू केलेली “हेल्मेट सक्ती’ मुळे नाराजी आहे. शहराअंतर्गत तासी 15 ते 20 किमीचा वेग असतो, असे असताना हेल्मेट सांभाळणे, वापरताना जिकरीचे होते. सध्या शहरात येणाऱ्या मार्गावर ही कारवाई सुरू असल्याने याचा भुर्दंड ग्रामीण भागातील नागरिकांवर पडत आहे. ही कारवाई चुकीची असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे, असे मनविसेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित यांनी सांगितले.

नगर – विना हेल्मेट दुचाकी व सीटबेल्ट न वापरणाऱ्या मोटार चालविणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईस सकाळी 8 वाजता सुरूवात झाली. सुमारे 100 पेक्षा जास्त दुचाकीस्वार व 25 मोटार चालकांना सीटबेल्ट न लावल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या कारवाईमुळे 60 हजारांचा दंड वसूल झाल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश मोरे यांनी सांगितले. अचानक सुरू झालेल्या कारवाईने वाहनधारकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून आले.

हेल्मेट वापरण्याबाबत सुप्रिम कोर्टाचे आदेश असून, त्याची अंमलबजावणी नगरमध्ये सुरू झाली. दुपारपर्यंत डीएसपी चौक, पीडब्लूडी चौक, चांदणी चौक येथे तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली. दुपारनंतर मार्केट यार्ड चौकात कारवाईस प्रारंभ झाला. हेल्मेट नसल्यास पाचशे रुपये तर सीटबेल्ट नसणाऱ्यांकडून 200 रूपये दंड वसूल केला जात आहे.

यापूर्वी दिवसभरात एखाद्या वाहन चालकावर हेल्मेट नसल्यास कारवाई केली जात होती. परंतु आता सरासरी एकाच दिवशी 50 पेक्षा जास्त चालकांविरुद्ध कारवाई झाली आहे. कामगारांची वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून इच्छितस्थळी पोहचताना कसरत सुरू होती. अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे शहरात वाहनधारकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

पोलिसांच्या डोक्‍यावरही हेल्मेट!

शहरात हेल्मेट सक्तीची कडेकोट अंमलबजावणीसाठी 30 वाहतूक पोलिसांसह इतर कर्मचारी डोक्‍यात हेल्मेट घालून रस्त्यावर उतरले आहे. दैनंदिन कर्तव्य बजावत असताना पोलिसांच्या डोक्‍यावर नसलेले हेल्मेट आज झळकू लागले आहे. सर्वसामान्यांना हेल्मेटची सवय लावणाऱ्या पोलिसांच्या डोक्‍यावरील हेल्मेट आज चर्चेचा विषय ठरत होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
5 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)