गोपाळपूरच्या ग्रामसभेत सरपंचपतीचा गोंधळ

सरपंच, उपसरपंचासह पाच सदस्य अनुपस्थित : ‘अंगणवाडी समिती’ वरून वादावादी

गोपाळपूर – नेवासे तालुक्‍यातील आदर्शगाव म्हणून ओळख असलेल्या गोपाळपूरची ग्रामसभा सरपंच, उपसरपंच यांच्या अनुपस्थितीत पार पडली. सभेत सरपंच पती, अंगणवाडीसेविका यांच्यात अंगणवाडी पाणी पुरवठा स्वच्छता समितीच्या सभेवरून व अंगणवाडी विकास निधीवरून शाब्दिक चकमक उडाली. त्यातून झालेल्या गोंधळातच ग्रामसभा आटोपती घेण्यात आली. गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामसभेला विशेष महत्त्व असते. परंतु ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांपैकी सभेला केवळ दोनच सदस्य हजर होते.

याबाबत अधिक माहिती अशी, ऑगस्ट महिन्यातील गोपाळपूर ग्रामपंचायतची ग्रामसभा शुक्रवारी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभा सरपंच, उपसरपंच किंवा गावातील प्रौढ व्यक्‍तींच्या अध्यक्षतेखाली पार पाडली जाते. परंतु या ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच उपस्थित नव्हते. तसेच सहायक कृषी अधिकारी, तलाठी यांच्या व्यतिरिक्‍त कोणत्याही खात्याचे अधिकारी उपस्थित नव्हते.

ग्रामसभा सुरू झाल्यानंतर सुरवातीला कृषी अधिकारी दीपक भागवत यांनी बोंडअळी व कृषीच्या इतर योजनांची माहिती दिली. यानंतर ग्रामसेवक यांनी प्रधानमंत्री आवास योजना, रोजगार हमी योजना या व्यतिरिक्‍त कोणतीही माहिती ग्रामस्थांना दिली नाही.

अंगणवाडीसेविका यांनी सभेमध्ये अंगणवाडी विकास निधी काढून दिला जात नसल्याचा प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी सरपंच पती यांना बोलण्याचा अधिकार नसतांनाही त्यांनी याबाबत माहिती दिली. अंगणवाडी पाणी पुरवठा स्वच्छता समितीची सभा घेतली जात नसल्याचे बोलताच अंगणवाडी सेविका यांनी सभा घेण्याविषयी वेळोवेळी पत्र दिले तर तुम्ही त्याचा स्वीकार केला नाही, सभेला आले नसल्याचे सांगितले. या वादावरून सभेमध्ये प्रचंड गोंधळ झाला.

हे सर्व घडत असताना अधिकारी म्हणून उपस्थित असलेले ग्रामसेवक रावसाहेब डौले यांनी शांत राहणाचे पसंत केले. प्रचंड गोंधळात ग्रामसभेतून ग्रामस्थांनी काढता पाय घेतला.

“सरपंच यांच्या सहीनेच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सरपंच का उपस्थित राहिले नाहीत हे मला सांगता येणार नाही? तसेच मी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना सभेबाबत पत्र देऊनही फक्‍त कृषी सहायक व तलाठी उपस्थित राहिले. उपसरपंच यांना काही कामानिमित्त बाहेर जायचे होते. त्यामुळे ते सभा सुरू होण्याआधीच सही करून गेले. परंतु यानंतर सभेमध्ये वाद होतील याची मला कल्पना नव्हती.
-रावसाहेब डौले, ग्रामसेवक, गोपाळपूर

“अंगणवाडी पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे अध्यक्ष सरपंच असतात व मी सचिव आहे. आमचे अंगणवाडी विकास निधी साठी बॅंकेत संयुक्‍त खाते आहे. मला अंगणवाडीच्या विकासासाठी तो निधी खर्च करायचा आहे. मला चेकवर सही द्या, अशी विनंती केली होती. परंतु त्यांचे म्हणणे बैठक घ्या असे होते. त्यानुसार आम्ही बैठक घेण्याचे ठरवले. सर्व सदस्य यांना तसे पत्र दिले. शेवटी सरपंच यांच्याकडे गेलो असता आम्हाला बैठकीचे पत्र मिळाले म्हणून सही द्या अशी विनंती केली. परंतु मला तो अधिकार नाही, असे त्यांनी उत्तर दिले. माझ्या पतीला भेटा असे सांगितले. त्यांच्या घरी निरोप देऊनही बैठकीला आले नाही. सदस्य आले परंतु अध्यक्ष नसल्याने बैठक झाली नाही. यामुळे आमचा अंगणवाडी विकास निधी आम्हाला सरपंचांची सही नसल्याने काढता आला नाही व खर्च करता आला नाही.
-अलका ढोकणे, सचिव, पाणी पुरवठा स्वच्छता समिती


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
19 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
4 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)