खामगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस

File photo

सरपंचपद खुले : तीन गावातून अनेक इच्छुक रिंगणात, तरुणांचीही मोर्चेबांधणी

गोपाळपूर – नेवासे तालुक्‍यातील जायकवाडी पुनर्वसन गाव म्हणून ओळख असलेल्या खामगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक 26 सप्टेंबरला होणार असून थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने यंदा कमालीची चुरस आहे. सरपंचपद सर्वसाधारण (खुले) असल्याने अनेक इच्छुक निवडणू रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

खामगाव क्र. 1, धनगरवाडी, चिकणी खामगाव अशा तीन गावात मिळून एक ग्रुप ग्रामपंचायत आहे. अकरा जागेसाठी निवडणूक होणार असून प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तीनही गावातील इच्छुकांनी त्याबाबत तयारीही सुरू केली आहे. तीन गावांचे मिळून 2 हजार 200 मतदार आहेत. 5 सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. 26 सप्टेंबरला मतदान होणार आहे.

गावामध्ये आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, शंकरराव गडाख यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे सध्या तरी सरपंचपदासाठी तीन गटाचे तगडे उमेदवार मैदान असतील, मात्र नेत्यांकडून डावलेले गेल्यास बंडखोरी करूनही अनेक जण अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे.

पूर्वी खामगाव हे एक गाव होते. जायकवाडी धरणासाठी या गावाचे पुनर्वसन झाले. खामगावचे चार गावांमध्ये विभाजन झाले. गोपाळपूरला स्वतंत्र ग्रामपंचायत असून खामगाव नंबर एक, धनगरवाडी व चिकणी खामगाव अशी एकच ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. पुनर्वसन गाव असल्याने रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, घरकुल, शाळा असे अनेक प्रश्‍न कायम आहेत. यामुळे जनतेतून निवडणूक होणाऱ्या सरपंचपदासाठी हे मुलभूत प्रश्‍न निवडणूक गाजवणार हे निश्‍चित. गावातील अनेक सुशिक्षित तरूण उमेदवारही यंदा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने काहींचे प्रयत्नही सुरू आहेत.

निवडणुकीत तेच तेच चेहरे..

गावातील ग्रामपंचायत असो किंवा सेवा संस्था प्रत्येक निवडणुकीत तेच तेच चेहरे समोर येतात. काहींना तर गावातील लोकही वैतागले आहेत. एखादा तरूण उमेदवार निवडून दिला तर वर्षानुवर्षे होत नसलेली विकास कामे होतील, पुनर्वसन झालेल्या गावाचा चेहरामोहरा बदलेल, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. परंतु, ज्या ज्येष्ठ लोकांना सत्तेची फळे चाखायची सवय लागली आहे ते खरोखरच तरूणांना पुढे करून गावची जबाबदारी देतील का? हाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
13 :thumbsup:
3 :heart:
2 :joy:
1 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)