महाराष्ट्राच्या नकाशावर गाजतेय आदर्श गोगलगाव

-गणेश घाडगे

नेवासे – गावातील लोकांच्या विचारात एकवाक्‍यता व समाजहित साधण्याची विचारसरणी असल्यास विकास साधला जाऊ शकतो, त्यासाठी फक्त प्रामाणिक प्रयत्नाची गरज असते हेच गोगलगाव (ता.नेवासा ) येथील उच्चशिक्षित पदवीधर सरपंच योगेश म्हस्के व ग्रामस्थांनी आपल्या एकजूटीमधून महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.

-Ads-

एखादे गाव एखाद्या विशिष्ठ क्षेत्रात अग्रेसर राहू शकते, आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकते, मात्र गोगलगाव हे याला अपवाद ठरत आहे. कारण गोगलगावच्या विकासाचा डंका सर्वच क्षेत्रात गाजताना दिसत आहे. गावातील तंटे असो, पर्यावरण संतुलनाचा विषय असो अथवा दारूबंदीसह अनेक क्षेत्रात गोगलगावाने आपला ठसा उमटवलेला आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित गोगलगाव जलयुक्तमध्ये आदर्शवत ठरले आहे.

तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार, एक गाव एक गणपती पुरस्कार, आदर्श आमदार दत्तक गाव विद्यापीठ, दत्तक गाव रक्तदान शिबिरात सहभाग, आयएसओ मानांकन प्राप्त ग्रामपंचायत, निर्मलग्राम आदी क्षेत्रातील गावाचे योगदान लक्षणीय आहे. गावाच्या विकासासठी गावातील प्रत्येकजण आपल्या पद्धतीने व तळमळीने करत असलेली सेवा हेच या गावाच्या विकासाचे गुपित आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, गावातील विविध मंडळे, सामाजिक कार्यकर्ते व यांची धडपड संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत ठरत आहे.

गोगलगावाचा आदर्श घेऊन सध्या अनेक गावामध्ये गाव विकासाची स्पर्धा निर्माण होत असल्याचे चित्र तालुक्‍यात दिसून येत आहे. येथील सरपंच योगेश म्हस्के हे उच्च शिक्षित आहेत. त्यांना देश-विदेशात उच्च पदावर नोकरीची संधी असतानाही गावाच्या विकासाचे ध्येय मनाशी बाळगून त्यांनी नोकरीचा पर्याय न स्विकारता गावाच्या विका साचे ध्येय समोर ठेवले. गावकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि गावाची चावी त्यांच्या हाती दिली, त्यांनी तो विश्‍वास सार्थ ठरवला. आपल्या मैत्रीच्या संबधातून सिनेअभिनेते स्वच्छतादूत मकरंद अनासपुरे यांना गाव दत्तक घेण्यास भाग पाडले. गावाचा विकास एकाच वर्षात दिसला, गाव राज्याच्या व देशाच्या नकाशावर जाऊन पोहचले.

लोकसहभागातून अवघ्या बारा महिन्याच्या आत गाव हागणदारीमुक्त योजनेचा नागरिकांना लाभ मिळवून दिला. ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना नाम फौंडेशन व स्वत:चे दीड लाख रुपये देत म्हस्के यांनी शौचालय बांधून दिले. वर्षभरात एकही तंटा गावाच्या बाहेर जाऊ न दिल्याने गाव तंटामुक्त झाले, गावातून वेड्याबाभळी काढून गावात भूमिगत गटार योजनेचे मोठे काम केले.

नेवासे तालुक्‍यातील गोगलगाव या दोन हजार लोकवस्तीच्या गावाची यशोगाथा मकरंद अनासपुरे यांनी जय स्वच्छमेव जयते बोला या चित्रपटातून रसिकापुढे आणली. टपरीमुक्त गाव करण्यासाठी गावातील दोन टपऱ्या बंद करून त्यांना स्टेशनरीची दुकाने टाकून दिल्याने गाव गुटखा व व्यसनमुक्त झाले. आजही तालुक्‍यात गोगलगाव विषयी सर्वाना कुतूहल वाटत आहे. हे गाव बघण्यासाठी राज्यभरातून लोक येत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)