वाहत्या गोदावरीचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

कोपरगाव – नाशिक जिल्ह्यातील दारणा व गंगापूर धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी आज (दि.2) दुपारी चार वाजता कोपरगावात पोचल्याने नागरिकांनी गोदावरी नदीपात्रातील पुलावर पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. समन्यायी पाणी वाटप कायद्याप्रमाणे ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात जायकवाडीस पाणी सोडण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती असतानाही नगर-नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून नऊ टीएमसी पाणी सोडण्यात आले.

नाशिक जिल्ह्यातील दारणा व गंगापूर धरणांतून गुरुवारी रात्री पाणी सोडण्यात आले. नांदुर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून सध्या गोदावरी नदीपात्रात 11 हजार 192 क्‍युसेक्‍स वेगाने पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी कोपरगाव शहरात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता पोहोचले. हे पाणी पाहण्यासाठी कोपरगावकरांनी जनार्दन सेतूवर गर्दी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनेक नागरिकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. दारणातून 10 हजार 190, तर मुकणेतून 1 हजार क्‍युसेक्‍सने सध्या जायकवाडीत पाणी सोडले जात आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी दिली. 2.64 टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून, किमान 5 दिवस गोदावरी नदी वाहती राहिल असेही त्यांनी सांगितले.
समन्यायी पाणी वाटपाचा बडगा 2012 नंतर सहा वर्षांनी गोदावरी कालव्यांना बसला असून, यंदा पावसाने पाठ फिरविल्याने खरीपही हातचा गेला.

रब्बीची शेतकऱ्यांनी आशा सोडली आहे. त्यामुळे यंदा बारमाही गोदावरी कालवे बेभरवशाचे झाले आहेत. शेतकऱ्यांना पाण्याअभावी शेती कशी करावी, असा प्रश्‍न पडला आहे. तसेच आगामी 2019-20 चा परिसरातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम धोक्‍यात येणार आहे. परिणामी त्यावर अवलंबून असणारे व्यवसायाचीही ठप्प पडणार आहेत.

गोदावरी नदीला पाणी नसल्याने वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे भरत भरत जायकवाडीकडे पाणी झेपावत आहे. अवैध पाणी उपसा होऊ नये, यासाठी नदीकाठच्या गावांतील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्याची धग सर्वांनाच बसत आहे.

ऐन दिवाळीत कोपरगाव शहरवासियांना तसेच गोदावरी कालव्यावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजनांना झळ बसत आहे. पिण्यासाठी कधी आर्वतन सुटणार, याचीच चातकाप्रमाणे वाट पाहात आहेत. कोपरगाव नगरपालिकेच्या साठवण तलावात अत्यल्प पाणीसाठा आहे. पाऊस नसल्याने कार्यक्षेत्रातील विहिरीही आटल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही ग्रामस्थ व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)