गोदावरीच्या दुधात ‘ डिटर्जंट’ची भेसळ

File Photo

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : श्रीरामपूरमध्ये 800 लीटर भेसळयुक्त दूध नष्ट

-प्रदीप पेंढारे

खाद्यतेलाची तपासणी सुरू

दिवाळीचा उत्सव सुरू झाले आहे. विविध खाद्यपदार्थांची रेलचेल या दिवसांमध्ये असते. त्यासाठी खाद्यतेलाची मागणी वाढते. याच काळात भेसळीचे किंवा कमीप्रतीचे खाद्यतेल देखील बाजार येते. अन्न व औषध प्रशासनाने याची दखल घेत कोपरगाव, संगमनेर, कर्जत, शिर्डी आणि नगरमधून खाद्यतेलाचे उत्पादक आणि विक्रेते यांच्याकडून नमुने तापसणीसाठी घेतले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणी पाठवून देण्यात आले आहे. ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर – नायगाव नवरे (ता. श्रीरामपूर) येथील गोदावरी दूध संकलन केंद्रावरील दुधात भेसळ होत असल्याचे समोर आले आहे. दुधात डिटर्जटची भेसळ होत असल्याने अन्न व औषध प्रशासनाने सुमारे 800 लीटर दूध नष्ट केले आहे. जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रावर आजही दुधात भेसळ होत असल्याचे या कारवाईवरून समोर आले आहे.

गोदावरी दूध संकलन केंद्र हे दत्तात्रय साठे हे चालवितात. या केंद्रावर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे दूध गोळा होते. या दुधात भेसळ असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना मिळाली होती. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त किशोर गोरे व बालू ठाकूर यांनी त्याची माहिती काढली. या माहितीला खबऱ्यांकडून दुजोरा मिळाला. अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी, साहेबराव मुळे, आनंद पवार व मुंबईचे अन्न विश्‍लेषक तज्ञ डॉ. बडदे यांचे पथक या कारवाईसाठी नेमले. हे पथक भल्या पहाटे श्रीरामपूर येथील नायगाव नवरे शिवारात दाखल झाले.

गोदावरी दूध संकलन केंद्राच्या काही अंतरावर वाहनात हे अन्न सुरक्षा अधिकारी दबा धरून बसले. केंद्रावर दूध संकलन सुरू झाल्याच्या काही कालावधीनंतर अधिकाऱ्यांनी छापा घातला. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अचानक सुरू केलेल्या कारवाईमुळे केंद्रावर काही काळ गोंधळ निर्माण झाला.

“गोदावरी संकलन केंद्राकडे दूध संकलनाचा अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही परवाना नव्हता. संकलित दुधाची तपासणी अन्न विश्‍लेषणांकडून जागेवरून करून घेतली. त्यात दुधात “डिटर्जट’ची भेसळ असल्याचे तपासणीत समोर आले आहे. त्यावरून संकलित असलेले दूध नष्ट केले आहे.दुधाचे अधिक नमुने घेऊन ते सखोल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. तो अहवाल येताच संबंधित दूध संकलन केंद्र चालकावर अन्न व औषध अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करणार आहोत. – किशोर गोरे, सहायक आयुक्त (अन्न)

केंद्रावर संकलित झालेल्या दुधाची तपासणी अधिकाऱ्यांनी सुरू केली. अन्न विश्‍लेषण अधिकारी डॉ. बदडे यांनी तपासणीची किट काढून दुधाचे नमुने जागेवर तपासले. त्यात “डिटर्जट’ची भेसळ असल्याचे तपासणीत समोर आले. केंद्रावरील विविध कॅनमधील दुधाची तपासणीही करण्यात आली. त्यात भेसळ असल्याचे आढळले.

अधिकाऱ्यांनी केंद्राची कागदपत्रांची मागणी दत्तात्रय साठे यांच्याकडे केली. साठे यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाचा दूध संकलन केंद्राचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केंद्रावरील संकलित झालेले सुमारे 800 लीटरचे दूध भेसळीच्या संशयावरून नष्ट केले. केंद्रावरील दुधाचे काही नमुने घेतले आहेत. ही कारवाईची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे नाशिकचे सहआयुक्त चं. दा. साळुंखे यांनाही देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)