महाजन यांची शिष्टाई असफल

संग्रहित छायाचित्र

हजारे आंदोलनावर ठाम; मागण्या पूर्ण केल्यानंतरच फेरविचार

नगर – जनलोकपालांसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दोन ऑक्‍टोबरपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धीला येऊन त्यांची भेट घेतली. आंदोलन थांबविण्याची विनंती त्यांनी केली. त्यासाठी अण्णांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला; मात्र महाजनांची शिष्टाई यशस्वी झाली नाही. सर्व मागण्या प्रत्यक्षात पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनाच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे अण्णांनी त्यांना ठणकावून सांगितले.

शेतीमालाला डॉ. स्वामिनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे दीडपट भाव, स्वतंत्र कृषीमूल्य आयोग, राज्याच्या कृषीमूल्य आयोगांच्या शिफारशी अंमलात आणण्यात होत असलेली कुचराई, लोकपालांची व लोकनियुक्तांची नियुक्ती आदी मागण्यांसाठी हजारे यांनी गेल्या वषी दिल्लीत आंदोलन केले होते. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाजन यांनी मध्यस्थी केली होती. केंद्र सरकारच्या वतीने अण्णांना मागण्यांच्या पूर्ततेचे आश्‍वासन दिले होते.

अण्णांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सहा महिन्यांची मुदत दिली होती. त्यानंतर हजारे यांनी सरकारला वारंवार स्मरणपत्रे पाठविली; परंतु त्यांची दखल घेतली गेली नाही. पाच महिने झाले, तरी सरकारी पातळीवर कुठल्याही हालचाली नसल्याने दोन ऑक्‍टोबरपासून आंदोलन करण्याचा निर्णय हजारे यांनी घेतला आहे. इशाऱ्याबाबतची पत्रे त्यांनी यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविली आहेत. त्यावर त्यांना अजून कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही.

” यापूर्वी मार्चमध्ये केलेल्या आंदोलनाच्या वेळी सरकारने लेखी आश्‍वासने दिली. पाच महिने झाली, तरी आश्‍वासक असे पाऊल सरकारने टाकलेले नाही. पंतप्रधान कार्यालय ठोस कारवाई करीत नाही, तोपर्यंत आंदोलनाच्या निर्णयापासून आपण दूर जाणार नाही.
अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

” हजारे यांच्या मागण्यांपैकी बहुतांश मागण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित मागण्याही पूर्ण केल्या जातील. त्यामुळे त्यांनी आंदोलन थांबवावे, ही विनंती.
गिरीश महाजन, जलसंपदामंत्री

या पार्श्वभूमीवर महाजन यांनी पुन्हा राळेगणसिद्धी गाठली. सत्तर टक्के मागण्या पूर्ण झाल्या असून येत्या काही दिवसांत उर्वरित मागण्या पूर्ण होतील. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी हजारे यांना केली; परंतु सर्व मागण्या प्रत्यक्षात पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनापासून बाजूला हटणार नसल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांबरोबरदेखील माझी चर्चा झाली; पण सरकार फक्त आश्वासने देत आहे. मागण्यांची पूर्तता करीत नाही. यापूर्वीच्या आंदोलनाच्या वेळी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता झाली नसल्याने सरकार फसवणूक करीत आहे, असा हजारे यांचा समज झाला आहे. पंतप्रधान कार्यालयातून काही ठोस उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आपण आंदोलन करणार आहोत. सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

महाजन यांनी राज्य व केंद्र सरकारने आतापर्यंत हजारे यांच्या मागण्यांवर काय कारवाई केली, याची माहिती दिली. स्वामिनाथन आयोग लागू करण्याचा आणि पिकांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय झाला असून येत्या हंगामापासून तसा दर शेतकऱ्यांना निश्‍चितपणे मिळेल, असे महाजन यांनी सांगितले. अण्णांनी नमूद केलेले काही प्रश्न हे निवडणूक आयोगाच्या अखत्यारित असून केंद्र शासनाने यासंदर्भात निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला आहे.

केंद्रात लोकपाल आणि राज्यस्तरावर केंद्रात लोकपाल आणि राज्यस्तरावर लोकायुक्तांची नियुक्ती करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली असल्याचेही महाजन यांनी या वेळी सांगितले. महाजन यांनी हजारे यांचा मुख्यमंत्र्यांशी संपर्क करून दिला; परंतु त्यातूनही काहीच तोडगा निघाला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)