वरुणराजाची दडी; बळीराजाला हुडहुडी

“काळ्या आई’वर संकट : हवामान खात्याच्या तोडक्‍या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

नगर – खरीप हंगामाच्या प्रारंभी पडलेल्या पेरणी योग्य पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणी केली. परंतु, त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्‍यात आला. हवामान खात्याच्या चुकलेल्या व तोडक्‍या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. पिके माना टाकू लागली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना उभ्या पिकात नांगर फिरवावा लागणार असल्याने अशी चर्चा सुरू आहे. त्यातच वरूणराजाने दडीने शेतकरी वर्गात हुडहुडी भरली आहे. पाऊस येणार म्हणून आकाशाकडे डोळे लावून बसण्याशिवाय शेतकऱ्यांच्या हातात कायच शिल्लक नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अकोले तालुक्‍यातील महसूल मंडळातील गावे वगळता 89 महसूल मंडळे पुन्हा दुष्काळाच्या गडद परछायेत सापडली आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जमिनीत भेगा पडल्या असून, आसमंतातील काळ्या ढगांमधून पाऊस पडत नसल्याने भेगाळलेली जमीन अन्‌ माना टाकलेली पिके बळीराजाची चिंता वाढवत आहेत. पावसाचे काळे ढग लुप्त झाले आहेत. तसेच ढगाळ वातावरणामुळे वाचून काचून राहिलेल्या पिकांवर भरमसाठ रोगराई पडली आहे. दरम्यान, ऑगस्टमध्ये भरपूर पाणी होईल, पीक भरभरून येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, दमदार पाऊस तर झालाच नाही.
जिल्ह्यात यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने आतापर्यंत सुमारे 4 लाख 17 हजार हेक्‍टरवर पेरण्या झाल्या आहेत; मात्र, जुलै व ऑगस्ट महिन्याच्या दोन आठवडे उलटूनही पाऊस न झाल्याने 4 लाख हेक्‍टरवरील खरीप पिके संकटात सापडली आहेत. आता जरी पाऊस झाला तर तो खरीप हंगामासाठी उपयुक्‍त ठरणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी हंगामावर असणार आहे.

या हंगामात आतापर्यंत बाजरी 97 हजार 103 हेक्‍टर, मका 41 हजार 585, तूर 27 हजार 712, मूग 35 हजार 411, उडीद 28 हजार 409, सोयाबीन 68 हजार 980, कापूस 94 हजार 669 हेक्‍टर अशा पेरण्या झाल्या आहेत.
या व्यतिरिक्‍त ऊस 28 हजार 821, कांदा 21 हजार 932 तसेच चारा पिकांची 51 हजार 881 हेक्‍टरवर लागवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 43.28 टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच काळात 55.24 टक्के पाऊस झाला होता. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके हातची जात असल्याने शेतकरी धास्तावला आहे.

बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा

खरीप पिके घेण्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल असतो. जिल्ह्यात खरीप हंगामाचा पेरा 88 टक्के झाला आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग पडला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून येत्या 36 तासात सक्रिय होणार आहे. जिल्ह्यात अकोल्याचा काही भाग वगळता बहुतांशी ठिकाणी पाऊस रुसल्याने शेतकरी धास्तावल्याचे चित्र असून, बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

धरणातील पाणीसाठा (एमसीएफटीमध्ये)
धरण क्षमता यावर्षीचा साठा टक्के
भंडारदरा 11039 10441 94.58
मुळा 26000 16023 61.63
निळवंडे 8320 6509 78.23
आढळा 1060 248 23.40
मांडओहळ 399 71.21 17.85
घोड 7639 3576.96 46.82
खैरी 533 94.85 17.80
सीना 2400 529.93 22.08

पावसाळ्यातही टॅंकरवारी सुरूच

जिल्ह्यात बहुतांशी गावांत पावसाने हुलकावणी दिल्याने पाणीटंचाईची परिस्थिती कायम आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात वाड्या-वस्त्यांवर टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. संगमनेरमधील 16 गावे व 63 वाड्यावस्त्यांवरील 39 हजार 252 लोकसंख्येला शासकीय 15 तर खासगी 4 असे एकूण 19 टॅंकरने दररोज पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर पारनेर तालुक्‍यातील 4 गावे व 16 वाड्यावस्त्यांवरील एक हजार 920 लोकसंख्येला 3 शासकीय टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात सरासरी 43 टक्केच पाऊस झालेला आहे. त्यामुळे गाव तळे, विहीरीमध्ये पाणी न आल्याने ही टंचाई जाणवत आहे. जोरदार पाऊस झाल्यानंतर येथील टॅंकर बंद होतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे.

बळीराजाचे भगवंताला साकडे

जिल्ह्यत अकोले तालुका वगळता बहुतांशी ठिकाणी पावसाने हुलकावणी दिल्याने ठिकठिकाणी लोकांनी देव पाण्यात कोंडून, दिंडी काढून देवाला साकडे घातले जात आहे. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)