नगर – साईकृपा साखर कारखाना हिरडगाव शोषित शेतकरी आंदोलनाला दोन वर्षानंतर यश आले असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकित पेमेंट 1596 रु. प्रती क्विंटल प्रमाणे देण्यात आले आहेत. साईकृपा साखर कारखाना युनिट 2 ने नगर, पुणे, बीड व सोलापूर येथील शेतकऱ्यांकडून 1850 रु. प्रती क्विंटल प्रमाणे ऊस उचलला होता. क्विंटल मागे कमी मिळालेले अडीचशे रुपये व मुळ रक्कमेवरील व्याज मिळण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

साईकृपा साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे 38 कोटी रुपये थकित होते. थकित पेमेंट मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साईकृपा साखर कारखाना हिरडगाव शोषित शेतकरी आंदोलन उभे केले. या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सतत दोन वर्षे आंदोलने करुन पाठपुरावा करण्यात आला. तर 19 शेतकऱ्यांनी थकित पेमेंट मिळण्यासाठी न्यायालयात देखील दाद मागितली होती. या आंदोलनाने शेतकऱ्यांचे थकित पेमेंट मिळण्यास भाग पाडले.

कारखान्याची शिरूर एमआयडीसी जवळील जमीन विक्री करून, शेतकऱ्यांचे थकित पेमेंट देण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष राजेंद्र देवगावकर यांनी दिली. या आंदोलनासाठी विधिज्ञ ऍड.कारभारी गवळी यांचे मार्गदर्शन लाभले. आंदोलनात समितीचे अध्यक्ष राजेंद्र देवगावकर, बापूराव धुमाळ, दरीअप्पा आंधळकर, सिताराम काळे, उत्तम धुमाळ, आप्पा मोरे यांचा समावेश होता.

निवडणुका जवळ आल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पेमेंट देण्यात आले आहे. कारखाना बबनराव पाचपुते यांच्या ताब्यात असल्याने सत्ताधारी कारवाई होऊ नये यासाठी दबाव आणत होते. मतापोटी घाबरुन हे पेमेंट देण्यात आले असून, दोन वर्ष शेतकऱ्यांना छळण्यात आल्याचा आरोप ऍड.कारभारी गवळी यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)