नगर महापालिका रणसंग्राम २०१८ : आरोग्याचा जागर कधी होणार ?

महापालिकेच्या वैद्यकीय सुविधा अत्याधुनिक व्हाव्यात

नगर – कुठे कचरा साचलेला… कुठे कचरा पेटवून दिलेला… प्लास्टिक नालीत पडलेले… त्यामुळे नाली तुंबून सार्वजनिक रस्त्यावरून वाहते… कुठे नळ्याद्वारे दूषित पाणी येते… सांडपाणी तुंबल्याने दुर्गंधी सुटलेली… डास उत्पत्ती वाढलेली… नगर शहराच्या आरोग्याची ही परिस्थिती सांगणारे वर्णन सर्वश्रूत आहे. शहराची लोकसंख्या सुमारे पाच लाखापर्यंत असेल. या सर्व नगरकरांकडून आरोग्याचा वार्षिक खर्च पाहिल्यास तो सुमारे 50 कोटीच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. या खर्चाची सेव्हिंग झाल्यास नगरकरांना किती समाधान मिळेल, याचा अंदाजही बांधता येणार नाही. महापालिकेच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी प्रचारासह जाहिरनामे प्रसिद्ध केले आहेत. नगरच्या आरोग्याच्या दृष्टिने ठोस असे काहीच आश्‍वासन जाहिरनाम्यात दिसत नाही.

नगर शहरात छोटी-मोठी सुमारे साडेचारशे रुग्णालये आहेत. यात बहुतांशी खासगी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमधून मिळणारी अत्याधुनिक सुविधा नगरकरांचा “प्लस पाईंट’ आहे. परंतु आरोग्याचा लाभ घेताना त्यावर होणारा खर्च हजारोंच्या घरात असतो. यातून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडतेच. शहरात पावसाळा आला की, साथींच्या रोगांचा प्रार्दूभाव सुरू होतो. डेंगी, मलेरिया, व्हायरल इन्फेक्‍शन, गोचीड ताप, चिकणगुणिया, कावीळ, स्वाइन फ्ल्यू सारखी आजारे डोकेवर काढतात. या आजारांना खतपाणी मिळते ते अस्वच्छतेतून. नगर शहराची ओळख स्वच्छ शहर होण्यापेक्षा कचराकुंडीचे शहर म्हणून होऊ लागली आहे.

शहरातील प्रत्येक रस्त्यावर कचराकुंडी दिसते. ही कुंडी नियमितपणे साफ होत नाही. त्यामुळे कचरा कुंडीच्या ओसंडून वाहताना दिसतो. हा कचरा उचलण्यासाठी नगरकरांनी प्रशासनाला संपर्क साधल्यास त्याचा फायदा होत नाही. लोकप्रतिनिधींनीचे लक्ष या कामासाठी वेधावे लागते. नगर शहरात प्रतिदिन 150 टन कचरा पडतो. यात ओला आणि सुका कचरा याचा अंर्तभाव होतो. वैद्यकीय कचरा ही वेगळाच आहे.

हा कचरा जागेवरच साचून राहिल्यावर तो सडतो. त्यातून दुर्गंधी सुटते. त्यातून श्‍वसनाचे विकार सुरू होतात. डास उत्पत्तीतून डेंगी व मलेरियासारखे आजार फैलतात. प्रशासनाकडून धूर फवारणी होते. परंतु ती कधी होते, केव्हा होते, हेच सर्वसामान्य नगरकरांना कळत नाही. महापालिका प्रशासनाचा मलेरिया विभाग स्वतंत्र आहे. हा विभागाला कर्मचारी देखील आहेत. परंतु या विभागाचे कार्यालय आणि त्याचे साहित्य ठेवण्याची जागा पाहिल्यास त्याच्यावर उपचाराची गरज व्यक्त होते.

डेंगी आणि मलेरियापासून नगरकरांची मुक्तता करणारेच कार्यालय आजारी असल्याने नगरकर देखील त्याचाच भाग होतात, हे सध्याचे चित्र आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींपासून ते आता निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांपासून ही परिस्थिती लपलेली नाही. असे असताना लोकप्रतिनिधींच्या आणि राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात आरोग्यचा जागार कधी होणार, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्‍नच आहे.

बाळासाहेब देशपांडे रुग्णालयच आजारी!

महापालिकेचे बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची ख्याती सर्वत्र आहे. अलीकडच्या काळात हेच रुग्णालय आजारी पडल्याचे चित्र आहे. महिलांच्या प्रसूतीसाठी ख्यातनाम आहे. परंतु अलीकडच्या काळात येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची उणिव भासत आहे. उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने येथे महिलांच्या प्रसूती अडचणी ठरू लागल्या आहेत. यामुळे काहींच्या जीवाशी देखील खेळ झाला आहे. असे प्रकार या रुग्णालयात घडले असून, त्याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे देखील झाले आहे. अलीकडच्या काळात काहीशी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला यश देखील आले आहे. परंतु हा दवाखाना सर्वसामान्य नगरकरांच्या अपेक्षा उंचविणारा आहे. खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी हजारो रुपये लागतात. महापालिकेच्या दवाखान्यात मात्र खर्चच कमी येतो. त्यामुळे हा दवाखाना सर्वसामान्य नगरकरांसाठी फायद्याचाच आहे. असे असताना या रुग्णालयाच्या पुनरुज्जीवनासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होताना दिसत नाही, हे दुर्देव्य आहे. महापालिकेची रक्तपेढी देखील आजारीच आहे. या रक्तपेढीच्या सुधारणेसाठी प्रशासकीय पातळीवर अनेक प्रयत्न झाले. जीवनदान देण्यासाठी रक्त किती उपयोगी आहे, हे सर्वांनाच माहित आहे. ही रक्तपेढी अद्यावत व्हावी यासाठी प्रयत्न झाले. परंतु निधीअभावी यात आजही उणिवाच आहे. याबाबत ठोस अशी पावले राजकीय पातळीवर उचलली जाणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)