नगर महापालिका रणसंग्राम २०१८ : अर्ज भरण्याचा मुहूर्त पाहण्यासाठी उमेदवारांची ज्योतिषाच्या दारी झुंबड

नगर – महागनरपालिका निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी सध्या इच्छुक उमेदवारांची पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी तसेच मुहूर्तावर अर्ज दाखल करण्यासाठी धडपड सुरू आहे. सकाळी पक्ष कार्यालयात तर सायंकाळी ज्योतिषाच्या दारात, अशा उमेदवारांची सध्या झुंबड दिसत आहे.

महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच काही इच्छुकांनी आपला प्रचार सुरू केलेला आहे. आपल्या फ्लेक्‍सवर कुठल्याही पक्षाचे चिन्ह न टाकता अनेक उमेदवारांनी प्रचारास प्रारंभ केला होता. अनेकांना अद्यापही पक्षातर्फे झुलवत ठेवण्यात आल्याने त्यांची बेचैनी वाढत आहे. पक्षांतर्फे आघाडी-युतीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या इच्छुकांतही चलबिचल सुरू आहे.

-Ads-

युती-आघाडी झाल्यास आपली उमेदवारी जाणार, या चिंतेने अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत. त्यामुळे असे उमेदवार सकाळीच पक्ष व पक्षश्रेष्ठींच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत. अनेकांनी तर आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी धार्मिक विधीही सुरू केले आहेत. ज्योतिषांकडून सल्लेही घेतले आहेत.

महानगरपालिकेसाठी अर्ज भरण्याची मुदत 13 ते 20 नोव्हेंबरदरम्यान आहे. आता अर्ज भरण्यासाठी केवळ सोमवारचा (दि.19) दिवसच बाकी आहे. कारण 18 नोव्हेंबरला रविवार असल्याने शासकीय कार्यालयांना सुटी आहे. तसेच 20 नोव्हेंबरला ईद-ए-मिलाद असल्याने शासकीय सुटी आहे. त्यामुळे सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात मोठी गर्दी होणार आहे. त्यातच अनेकांना अद्यापही पक्षाच्या उमेदवारीची प्रतीक्षा आहे, तर काहींना उमेदवारी मिळूनही त्यांना चांगल्या मुहूर्ताची अर्ज भरण्यासाठी प्रतीक्षा आहे.

अनेक उमेदवार एरव्ही अंधश्रद्धेवर जाहीर कार्यक्रमांतून जाहीर टीका करीत असले, तरी निवडणुकीचा अर्ज भरताना ते मुहूर्त मात्र चुकू देत नाहीत. सध्या चांगल्या मुहूर्तावर अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच उमेदवार ज्योतिष्यांचे उंबरे झिजवित आहेत. तसेच ते सांगतील त्या प्रमाणे त्यांनी दिनचर्या सुरू केली आहे. दानधर्मही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा शेवटचा दिवस तसेच चांगला मुहूर्त असल्याने उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरण्यासाठी हाच दिवस मुक्रर केल्याचे समजते. त्यामुळे सोमवारी महानगरपालिकेचे कार्यालयात इच्छुकांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनानेही जय्यत तयारी सुरू केली आहे.

पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुहूर्तावर अर्ज भरल्याने कोण जिंकतो व मुहूर्त चुकल्याने कुणाचा महापालिकेत जाण्याचा मुहूर्त चुकतो, याची चर्चा मतदारांत सध्या सुरू आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)