भयमुक्त निवडणुकीसाठी 350 जणांवर तडीपारी

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची माहिती : निवडणुकीसाठी मनपात एक खिडकी योजना

चार पथकांकडून कारवाईला सुरूवात

आचार संहितेच्या अंमलबजावणीसाठी राहुल द्विवेदी यांनी चार पथकांची स्थापना केली आहे. फिरते पथक, स्टेशनरी पथक, चित्रीकरण पथक आणि या तिन्ही पथकाने संकलित केलेल्या माहितीचे विश्‍लेषण करून त्यावर अहवाल सादर करणारे चौथे पथक असणार आहे. हे पथकांना शहरात दिवसभर फिरून आचार संहितेबाबत तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नगर : महापालिकेची निवडणूक भयमुक्त आणि शांततेत पार पाडवी यासाठी शहरातून निवडणुकीच्या काळात 350 जणांना तडीपार करण्यात येणार आहे. शहर पोलिसांना गुन्हेगारी पार्श्‍वभूमीवर असलेल्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याचबरोबर निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतः सूत्रे हाती घेतली आहे. महापालिकेच्या 17 प्रभागातील सर्व मतदानकेंद्रे ही राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे मॉडेल मतदान केंद्रे असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी दिली.

राहुल द्विवेदी यांनी आज बुथस्तरीय मतदान अधिकारी आणि त्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींना महापालिका निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, उपजिल्हाधिकारी संदीप आहेर, तहसीलदार तथा प्रभारी उपायुक्त एफ. आर. शेख उपस्थिती होती.

उमेदवाराचे व्हिजन तपासले जाणार

उमेदवाराचे प्रभागासाठी काय व्हिजन असणार आहे, हे निवडणूक आयोगाने शपथपत्रावर मागितले आहे. उमेदवाराला हे व्हिजन 500 शब्दांत लिहून द्यायचे आहे. असे हे शपथपत्र पहिल्यांदाच मागविले जात आहे. उमेदवारीचा अर्ज भरतानाच हे व्हिजन शपथपत्र द्यावयाचे आहे. त्याचबरोबर उमेदवाराला स्वतःवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची तपशीलवार माहिती देणे शपथपत्राद्वारे अनिवार्य करण्यात आले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी द्विवेदी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकाही केल्या आहेत. त्याचीही त्यांनी माहिती दिली. आदर्श आचार संहितेची अंमलबजावणीसाठी आचारसंहिता कक्ष प्रमुख म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज भरताना अडचणी येऊ नयेत आणि त्याची प्रशासकीय माहिती मिळावी यासाठी महापालिकेत एक खिडकी योजना राबविणार असल्याचेही, राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

महापालिकेचे उपअभियंता परिमल निकम आणि वृक्षसंवर्धन व उद्यान अधिकारी किसन गोयल, सिस्टीम मॅनेजर अंबादास साळी हे त्यांचे सहायक असतील. स्थायी समिती सभापतींचे कार्यालय, महापालिका मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत हे त्यांचे कार्यालय असणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक खर्च हिशोब तपासणी प्रमुख म्हणून महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत खरात हे असणार आहेत.

मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर आणि सहायक नगररचनाकार वैभव जोशी हे सहायक म्हणून काम पाहणार आहेत. मतदार यादीवर हरकती घेणारे 90 टक्के हे राजकीय पक्ष आहे. या हरकती निकाली काढण्यात आल्या आहेत. दहा टक्के हरकतींचा लवकरच निपटारा करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)