तडीपारी रोखण्यासाठी विनवण्या!

शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुनावण्या सुरू : दिग्गज नेत्यांवरही कारवाईच टांगती तलवार

जगताप व राठोड यांच्या सुनावणीकडे लक्ष

आमदार अरुण आणि संग्राम जगताप या दुहींना आणि माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर देखील कारवाई प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे तडीपारीच्या प्रस्तावात नगरसेवक सुवेंद्र गांधी यांचे नाव आहे. या दिग्गज नेत्यांच्या सुनावणीकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. या नेत्यांवर कारवाई झाल्यास संबंधित नेते कोणती भूमिका घेतात, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

नगर  – महापालिका निवडणूक काळात शहरासह जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा महसूल प्रशासनाकडे दाखल झालेल्या 555 तडीपारांच्या प्रस्तावावर सुनावण्या आजपासून सुरू झाल्या आहेत. हे प्रस्तावावर कारवाई होऊ नये यासाठी हमीपत्र देण्यांपासून राजकीय कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी प्रशासनाकडे विनवण्या सुरू केल्या आहेत. दरम्यान, प्रस्तावाची पूर्ण छाननी करूनच निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया प्रातंधिकारी उज्वला गाडेकर यांनी दिली आहे. तडीपारीच्या प्रस्तावावरील काही सुनावण्या व निर्णय सोमवारी (ता. 12) होणार आहे. त्यामुळे प्रस्ताव दाखल झालेल्यांनी कारवाई होऊ नये म्हणून देव पाण्यात घातले आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात राडेबाजी करणाऱ्यांवर तडीपारीची आणि हद्दपाराची कारवाई शहर पोलिसांनी सुरू केली आहे. शहर हद्दातील चार पोलीस ठाणे येतात. यात मुख्यत्वः कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी आणि भिंगार पोलीस ठाण्याचा समावेश आहे. या पोलीस ठाण्यांतून सुमारे 555 प्रस्ताव तडीपारीसाठी जिल्हा महसूल प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. कोतवालीकडून 210, तोफखान्याकडून 235, भिंगार 100 व एमआयडीसी आठ, असे एकूण 555 तडीपारीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.

राजकीय नेतेच रडावर

सुवेंद्र गांधी, विक्रम राठोड, श्रीपाद छिंदम, किशोर डागवाले, गणेश भोसले, शिवाजी कदम, संभाजी कदम, नंदू बोराटे, दिलीप सातपुते, अशोक दहिफळे, बंटी सातपुते, अफजल शेख, हर्षवर्धन कोतकर, गजेंद्र दांगट, विकी जगताप, नरेंद्र कुलकर्णी, बाळासाहेब बोराटे, आसाराम कावरे, गणेश हुच्चे, अजय चितळे, सुनील कोतकर, बंटी राऊत, मयूर बोचूघोळ यांना तडीपारीच्या नोटिसा काढण्यात आल्या आहेत. यातील बहुतांशी इच्छुक उमेदवारांच्या यादीत आहेत.

तोफखाना पोलीस ठाण्याकडून सर्वाधिक सुमारे 235 प्रस्ताव दाखल झाले आहे. तोफखाना पोलीस ठाणे सावेडी उपनगरात येते. सावेडी उपनगर हे उच्चभ्रू वसाहतींसाठी ओळखले जाते. याच परिसरातील पोलीस ठाण्याकडून सर्वाधिक प्रस्ताव तडीपारीसाठी दाखल झाल्याने उच्चभ्रू वसाहतीतील लोकांच्या भुवया उंचवल्या आहे. सावेडीतील गुन्हेगारांचा अड्डा झाला आहे, अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्य सावेडीतील नागरिकांकडून उमटू लागल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांतील राजकीय घडामोडी पहिल्यास राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यातील “वॉर’ सर्वश्रूत आहे. केडगावमधील पोट निवडणुकीत दोघा शिवसैनिकांची हत्या झाली. या गुन्ह्यात राष्ट्रवादीच्या दोघांना आमदारांसह भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना आरोपी करण्यात आले. हत्याकांडानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या राष्ट्रवादीचा राडा हा देखील संवेदनशीलता ओलंडल्याचा प्रकार होता. या सर्व पार्श्‍वभूमीवर अहमदनगरची ओळख राज्यात गुन्हेगारांचा जिल्हा म्हणून झाली होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर महापालिका निवडणूक होत आहे.

जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत या निवडणुकीत कोणत्याही प्रकाराच्या कायदा-सुव्यवस्थेचा आणि शातंतेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी सुरू केली आहे. यातूनच शहर पोलिसांनी सुमारे 555 जणांचे तडीपारीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल केले आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रस्तावांवर सुनावण्या सुरू केल्या आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत पाच सुनावण्या झाल्या होत्या.

उर्वरीत सुनावण्या सोमवारी (ता. 19) होणार आहे. याच वेळी अर्ज भरण्याची उमेदवारांना घाईगडबड असणार आहे. त्यातच तडीपारीचा आदेश आल्यावर निवडणुकीवर परिणाम होईल, म्हणून तडीपारीच्या नोटिसा निघालेल्यांनी कारवाई होऊ नये म्हणून विनवण्या सुरू केल्या आहेत. काहींनी कारवाईतून सुटका होण्यासाठी देव पाण्यात घातले आहे. ज्योतिषाकडे धाव घेत, गुरूंचा सल्ला घेऊन मनोबल वाढविले आहे. परंतु कारवाईचा आदेश सोमवारी झाल्यावर तडीपारीचे चित्र अधिक स्पष्ट होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)