चारित्र्य पडताळणी दाखल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज
नगर – महापालिका निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी भावी नगरसेवकांना सध्या पोलिस अधीक्षकांसह पोलिस ठाण्याचे उंबरडे झिजवावे लागत आहे. पोलिसांकडून शुद्ध चारित्र्याचा दाखला मिळविण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. इतर वेळी पोलिस अधीक्षक कार्यालयात चारित्र्य पडताळणीचा दाखल घेण्यासाठी किरकोळ वर्दळ असते. परंतू महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने हे दाखल घेण्यासाठी सध्या मोठी गर्दी होत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस उरल्याने इच्छुकांची दाखल घेण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे.
महापालिका निवडणुकीसाठी आता केवळ दोन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ असल्याने इच्छुकांना दाखल घेण्यासाठी जोरदार धावपळ करावी लागणार आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांनी मुलाखती घेण्याचा सोपस्कार पूर्ण केला असून आता उमेदवारी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवसेनेने 51 तर भाजपने 15 उमेदवार जाहीर केले आहे.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडीची चर्चा सुरू आहे. त्यांनी अद्यापही उमेदवार जाहीर केले नसले तरी उमेदवार निश्चित केले आहे. त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यात काही इच्छुकांचा अद्यापही उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे. मतदार व कार्यकर्त्यांच्या मागे धावणाऱ्या उमेदवारांना चारित्र्य पडताळणीचा दाखल मिळविण्यासाठी पोलिस ठाण्याचे उंबरडे झिजवावे लागत आहे.
चारित्र्य पडताळणीचा दाखल मिळविण्याची प्रकिया देखील ऑनलाईन असल्यामुळे उमेदवारांना कधी पोलीस ठाण्याकडे तर कधी पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा वाचक शाखेकडे धाव द्यावी लागत आहे. उमेदवारी देतांना विविध पक्षांकडून राजकारणात होत नसेल एवढी सुक्ष्म तपासणी व पडताळणी करण्याचे काम पोलिसांच्या जिल्हा वाचक शाखेकडून केले जात आहे.
सध्या तरी या विभागाचे काम वाढले आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाऊगर्दी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. दाखला मिळविण्यासाठी उमेदवार समक्ष लागत असल्याने त्याला या ठिकाणी वेळ द्यावा लागत आहे. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा