नगर महापालिका रणसंग्राम 2018 : इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे ‘भाजप’ नेते बेजार

मंत्र्यांसह संघटनेतील नेत्यांचे उमेदवारीसाठी फोन; समजूत काढण्यातच जातोय वेळ

नगर – महापालिका निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतींना भाजपला पहिल्यांदा उदंड प्रतिसाद मिळाला. 68 जागांसाठी तब्बल 294 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्यामुळे आता उमेदवारी देतांना भाजपच्या स्थानिक नेत्यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. एका जागेसाठी तीन ते चार उमेदवार तर काही ठिकाणी सात ते आठ इच्छुक गुडघ्याला बाशिंन बांधून उभे असल्याने त्यापैकी कोणाला उमेदवारी द्यावी, हा प्रश्‍न पडला आहे.

त्यामुळे स्थानिक भाजपचे नेते बेजार झाले आहेत. त्यात इच्छुकांच्या उमेदवारीसाठी थेट मंत्री व संघटनेतील नेत्यांकडून फोनाफोनी होत असल्याने नेते वैतागले आहेत. सध्या तरी इच्छुकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात असून त्यात वेळ खर्च होत आहे.

भाजपने पहिली 15 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर लगेच दुसरी किंवा अंतिम 53 उमेदवारांची यादी रविवारपर्यंत जाहीर होणे अपेक्षित होते. परंतू इच्छुकांची संख्या एवढी मोठी आहे की, त्यातून एकाची निवड करणे म्हणजे तारेवरची कसरत स्थानिक नेत्यांची झाली आहे. शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी व माजी शहरजिल्हाध्यक्ष ऍड. अभय आगरकर यांच्या मनोमिलन झाले असले तरी अप्रत्यक्ष दोन गटाचे इच्छुकांनी दावा केल्याने आता या दोन्ही नेत्यांची पंचाईत झाली आहे.

एकाला उमेदवारी द्यावी तर दुसरा गट नाराज होणार आहे. त्या भितीने खा. गांधी व ऍड. आगरकर बेजार झाले आहेत.पहिली यादी जाहीर केल्यानंतर अनेकांच्या नाराजीला या नेत्यांच्या तोंड द्यावे लागले. ही नाराजी थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत गेली. त्यामुळे आता पुढील 53 उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी नेते ताकही फुकंण पित आहेत. पहिल्या यादीत प्रभाग क्रमांक 5 चे सर्वच उमेदवार जाहीर करण्यात आले. त्या ठिकाणी निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने ऍड. आगरकर यांची कोंडी झाली आहे.

पहिल्या यादीमुळे झालेला गोंधळ अजूनही निस्तरण्यात येत असतांना दुसरी किंवा अंतिम यादी जाहीर करणे चुकी असल्याने ही यादी लांबणीवर पडली आहे. सध्या तरी अंतिम यादी जाहीर होण्याची शक्‍यता दुरापास्त झाली असून ज्यांना उमेदवारी निश्‍चित केली आहे. त्यांना आता थेट पक्षाचा एबी फार्म देण्यात येण्याची शक्‍यता आहे. त्यातून नाराजी कमी करण्याचा प्रयत्न आहे.

सध्या कोअर कमिटीचे सदस्य पालकमंत्री प्रा. राम शिंदे अधिवेशनासाठी मुंबईकडे रवाना झाल्याने आता सर्वच भिस्त खा. गांधी यांच्या खांद्यावर आहे. त्यांना आता उमेदवार निश्‍चित करावे लागणार आहे. त्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडून अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीत.त्यामुळे या आघाडीची रणनिती कळण्यास तयार नाही. यामुळे देखील भाजपकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यास विलंब होत आहे.

इच्छुकांची संख्या वाढल्याने आता त्यापैकी कोणाला उमेदवारी द्यावी असा प्रश्‍न आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहे. त्यातून वरिष्ठपातळीवरून फोन होत असल्याने कोणालाही नाराज करता येत नाही. उमेदवारी देतो असे म्हणावे लागते. परंतू इच्छुकांच्या भाऊगर्दीत कोणाला उमेदवारी देणार हा विषय नेत्यांसाठी डोकेदुखीचा झाला आहे.

सध्या तरी समजूत काढण्यात येत आहे. पण शब्द काय द्यावा असा प्रश्‍न आहे. स्वीकृत नगरसेवकांची संख्या मर्यादीत आहे. त्यामुळे तोही अडचणीत ठरणार आहे. त्यात तिकीट न मिळाल्यास बंडखोरी करण्याची भाषा अनेक जण करीत आहे. बंडखोरी होणार नाही याची काळजी आता या नेत्यांना द्यावी लागणार आहे. रात्र-रात्र जागून उमेदवारीचा घोळ मिटविण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)