नगर महापालिका रणसंग्राम : ‘भाजप’मध्ये राजीनामा सत्र

नगर महापालिका रणसंग्राम : धनंजय जामगांवकर, शांतीलाल चोरडिया यांनी दिला भाजपच्या पदाचा राजीनामा

नगर – केडगावात भारतीय जनता पक्षाने घडवून आणलेल्या राजकीय भूकंपाचे पडसाद शहरासह जिल्ह्यात उमटले आहेत. या भूकंपाचे धक्के भाजपला देखील बसू लागले आहे. खेळी करायला गेले आणि अंगलट आली, अशीच स्थिती भाजपची झाली आहे. केडगावमधील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्यास सुरूवात केली असून, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले आणि ऍड. अभय आगरकर यांच्या सोयीच्या राजकारणावर टीका सुरू केली आहे. भाजपचे शहर उपाध्यक्ष धनंजय जामगांवकर, केडगावचे भाजप मंडल सरचिटणीस शांतीलाल चोरडिया यांनी पदाचा राजीनामा शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्याकडे सादर केला आहे.

भाजपने केडगाव उपनगरात राजकीय खेळी करत कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना आठ जागांवर उमेदवारी दिली. काही क्षणात हा निर्णय झाला. राजकीय समीकरणे बदलली. भाजपच्या या खेळीने कॉंग्रेस पुरती घायाळ झाली. या निर्णयाच्या धक्के भाजपला देखील बसू लागले आहेत.

केडगावमधील दोन प्रभागातून इच्छुक असलेल्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या निर्णयाविरुद्ध शड्डू ठोकला आहे. पक्षाच्या स्थानिक पाळीवरच्या नेत्यांच्या या निणर्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी सुरू केल्या आहेत. जामगांवकर व चोरडिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे.

खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले आणि ऍड. अभय आगरकर यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. केडगाव हत्याकांड आणि अशोक लांडे खून प्रकरणात आरोपी असलेल्या भानुदास कोतकर याच्या समर्थकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी दिली आहे. भाजपचा हा प्रकार म्हणजे “पार्टी विथ डिफरेन्स’ हाच का, असा सवाल कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे.

भाजपचा हा निर्णय शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा होता. परंतु तोच निर्णय “बूमरॅंग’ झाला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी वेगळी मोट बांधत या निर्णयाविरोधात पक्षश्रेष्ठींकडे धाव घेण्याची तयारी केली आहे. या निर्णयाचे पडसाद भविष्यातील निवडणुकांवर देखील उमटणार आहेत. छिंदमप्रकरणामुळे भाजप शहरात पुरती घायाळ असतानाच हा “सोयरकीचा’ निर्णय आणखी महागात पडणार असल्याचे काही कार्यकर्ते बोलवून दाखवू लागले आहेत.

डॉ. सुजय विखेंचा निर्णय चुकलाच : दीप चव्हाण

महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसची सर्व सूत्रे डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. डॉ. विखे पाटील मोजक्‍याच लोकांना बरोबर घेऊन निर्णय घेत होते. या निर्णय प्रक्रियेपासून स्थानिक पदाधिकाऱ्यांना दूर ठेवण्यात येत होते. त्याचवेळी काही तरी चुकीचे निर्णय होत असल्याची कुणकूण लागली होती आणि ती भीती केडगावच्या रूपाने पुढे आली आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने डॉ. विखे पाटील यांनी घेतलेले निर्णय आता चुकीचे ठरू लागले आहेत, असा आरोप कॉंग्रेसचे प्रभारी शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी केला आहे.

केडगावच्या भाजप खेळीने कॉंग्रेसला काहीच फरक पडत नाही. या उपनगराला शहराला महापालिकेत कॉंग्रेसकडून महापौर दिला आहे. तेथील विकास हा कोणा व्यक्तीचा नसून, पक्षाने केलेला आहे. आजही तेथील मतदार हा कॉंग्रेसचाच आहे. अपक्षांना तिथे बळ देऊन कॉंग्रेसचे अस्तित्त्व दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया दीप चव्हाण यांनी “प्रभात’शी बोलताना दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)