किंगमेकर जगतापांनी खेळले सावेडीत ‘पाऊलबुधे’ कार्ड

‘जगताप-पाऊलबुधे’ यांची जवळीक विरोधकांची डोकेदुखी ठरणार

नगर  – राष्ट्रवादी कॉंग्रेस महापालिका निवडणुकीत गमिनी काव्याने पुढे सरकत असल्याचे दिसू लागले आहे. विरोधकांना संधीच द्यायची नाही, अशी ही रणनीती आहे. आमदार अरुण जगताप हे या रणनीतीचे “किंगमेकर’ आहेत आमदार अरुण जगताप यांच्यावर दहा वर्षापासून नाराज असलेले विनीत पाऊलबुधे पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर आले आहेत. ‘जगताप-पाऊलबुधे’ यांचे एकत्र आल्याने विरोधकांच्या भुवया उंचवल्या तर आहेच, परंतु सावेडी उपनगरात विरोधकांना ही “युती’ डोकेदुखी ठरणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज मुलाखती घेऊन त्यांचा शहरातील “टिआरपी’ दाखवून दिला आहे. या मुलाखतींमध्ये वैशिष्ट ठरले ते विनीत पाऊलबुधे यांच्या आगमनाचे! माजी नगरसेवक विनीत पाऊलबुधे यांचा 2008 च्या निवडणुकीत पराभव झाला होता. या पराभवाला ते जगताप यांना कारणीभूत मानत होते. तेव्हापासून ते जगताप आणि राष्ट्रवादी पक्षापासूनच दूर होते. परंतु पाऊलबुधे यांनी आमदार अरुण जगताप यांचा 2003 निवडणुकीत पराभव केला होता, हा देखील इतिहास आहे. त्यासाठी त्यांना शिवसेना व भारतीय जनता पक्षाची मदत झाली होती. दोघांनी एकमेंकाच्या राजकीय वचपा काढला, हेही तेवढेच खरं!

जगताप व पाऊलबुधे आता यातून सावरले आहेत. या काळात राजकीय पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुखांनी जगताप दुहींवर विश्‍वास वाढविला आहे. त्यातूनच शहराची जबाबदारी त्यांच्यावर सोपावली आहे. जगताप दुही देखील पक्षाध्यक्षांच्या विश्‍वासाला खरे उतरले आहेत. त्याची दखल घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व अजित पवार यांनी महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आमदार अरुण जगताप व त्यांचे पूत्र आमदार संग्राम यांच्यावर सोपावल्याचे दिसते आहे. आमदार जगताप दुहींनी देखील या निवडणुकीचे नियोजन वरिष्ठांना विश्‍वासात घेऊन केल्याचे दिसते आहे.

आमदार जगताप दुहींनी महापालिकेच्या निवडणुकीची रणनीती अगदी छुप्यापद्धतीने आखली आहे. जवळच्या निवडक पदाधिकाऱ्यांना या रणनीतीची भनक आहे. यातूनच मुलाखती दोनदा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे. या मुलाखतींसाठी शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. यावरून राष्ट्रवादीचे शहरातील ताकद दिसते. परंतु या सर्वांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले ते विनीत पाऊलबुधे!

दहा वर्षांपासून जगताप-पाऊलबुधे हा संघर्ष संपूर्ण शहराने पाहिला आहे. या संघर्षात पाऊलबुधे वरकरणी एकाकी दिसत होते. परंतु त्यांना अनेकांची छुपी रसद होती, हे देखील सर्वश्रूत आहे. तरीही आमदार जगताप दुही या सर्वांना शह देण्यात यशस्वी ठरली आहे.

परिणामी महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर जगताप-पाऊलबुधे ही “युती’ झाली आहे. ही युती सावेडी उपनगरात विरोधकांच्या भुवया उंचविण्यास कारणीभूत ठरली आहे. त्याचप्रमाणे विरोधकांनी सावेडीसाठी आखलेल्या रणनीती फिस्कटविण्यासाठी देखील राष्ट्रवादीला फायदेशीर ठरू शकते. शिवसेनेने युवकांच्या माध्यमांतून सावेडीत वर्चस्व वाढविले होते.

त्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा घेऊन शक्तीप्रदर्शनही केले होते. योगीराज गाडे यांच्या रुपाने युवक नगरसेवक शिवसेनेने येथे दिला आहे. आमदार अरुण जगताप यांनी विनीत पाऊलबुधे यांच्या निमित्ताने सावेडी उपनगरातून बाहेर काढलेले हे कार्ड निवडणुकीचे बरीच समीकरणे बदलू शकते. हे सर्व चित्र मतपेटी फुटल्यावर अधिक स्पष्ट होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
78 :thumbsup:
34 :heart:
2 :joy:
4 :heart_eyes:
2 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)