नगर जिल्ह्यात 7 लाख 79 हजार लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा

361 गावे, 1 हजार 932 वाड्यांना 457 टॅंकर चालू

नगर – जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून गेल्या दोन महिन्यांतच टॅंकरची संख्या चारशेच्या पुढे गेली आहे. सध्या 361 गावे व 1 हजार 932 वाड्यांवरील सुमारे सात लाख 79 हजार 440 लोकांना टॅंकरचे पाणी प्यावे लागत आहे. फेब्रुवारी महिन्यात ही स्थिती असल्याने पुढील उन्हाळ्याचे तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे यंदा टॅंकरची संख्या हजारी पार करेल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यंदाचा पावसाळा संपूर्ण कोरडा गेला. पावसाने सरासरीही गाठली नाही.त्यामुळे खरिपासह रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून निसटला. सुदैवाने धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांचे साठे बऱ्यापैकी आहेत. परंतू आता या धरणांमध्ये देखील पाणीसाठा कमी झाला आहे. ऑक्‍टोबरपासूनच जिल्ह्यात टंचाईने डोकेवर काढल्याने टॅंकर सुरू करण्यात आले.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवत जुलैपर्यंत पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन केले. एकीकडे ऑक्‍टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या चार महिन्यांत जिल्ह्यात पारा निच्चांकी घसरला असला तरी दुसरीकडे टॅंकरची संख्या भर हिवाळ्यातही वाढतच गेली. आजअखेर जिल्ह्यात 457 टॅंकरने 7 लाख 79 हजार 440 लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून टॅंकरची मागणी वाढत असून त्या दृष्टीने प्रशासनाकडून देखील तातडीने टॅंकर सुरू केले जात आहे.

सध्या 457 टॅंकर चालू असून त्यात 23 शासकीय तर 434 खासगी टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अजून मार्च, एप्रिल व मे असे उन्ह्याळ्याचे तीन महिने जायचे आहेत. या काळात तीव्र पाणी व चाराटंचाई भेडसावणार असल्याने टॅंकरची संख्या एक हजारच्या वर जाण्याची दाट शक्‍यता आहे. गेल्या 17 वर्षांच्या इतिहासात टॅंकरची संख्या साडेआठशेच्या वर गेलेली नाही. 2003 मध्ये 699, सन 2012 मध्ये 707 व 2015 मध्ये 826 टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. सध्या अकोले, श्रीरामपूर वगळता उर्वरित सर्वच तालुक्‍यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सार्वधिक पाथर्डी तालुक्‍यात 123 टॅंकर चालू आहेत.

यंदा मात्र उन्हाळा सुरू होण्याआधीच टॅंकर चारशेच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे हा आकडा तिप्पट होण्याची दाट आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. सध्या तरी प्रशासनाकडून टंचाई उपाययोजनेत केवळ टॅंकरने पाणीपुरवठा करणे ही प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहे. अन्य योजनांसाठी पाण्याचे स्त्रोत नसल्याने नळपाणीयोजना प्रभावीपणे चालविणे अशक्‍य झाले आहे. आज ग्रामीण भागातील स्वतंत्र पाणीयोजना देखील बंद पडल्याने त्या ठिकाणी टॅंकर हा एक पर्याय उरला आहे.

टॅंकरच्या आवाजाकडेच डोळे

ग्रामीण भागात टॅंकर आल्यानंतर लगबगीने पाणी भरणे हेच लोकांचे मुख्य काम सध्या झालेले आहे. शेतात काडीचेही काम नाही अन्‌ गावातील विहिरी, बारवात पाण्याचा टिपका नसल्याने सकाळपासून टॅंकरची वाट पाहणे हीच महिला वर्गाची ड्युटी बनली आहे. सार्वजनिक विहिरीत टॅंकरचे पाणी सोडले की एकच झुंबड उडते अन्‌ अर्ध्या तासात विहीर पुन्हा रिकामी केली जाते. काही ठिकाणी गल्लोगल्ली जाऊन प्रतिमाणसी मोजून पाणी दिले जाते.

जनावरांच्या पाण्याचा हिशोब नाही

दररोज प्रतिव्यक्ती 20 लिटर याप्रमाणे टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. या हिशोबाने लोकसंख्येच्या प्रमाणात तीन ते चार खेपा केल्या जातात. परंतु यामध्ये जनावरांसाठी पाण्याची तरतूद नसल्याने शेतकऱ्यांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

तालुकानिहाय टॅंकरची स्थिती

संगमनेर- 46 गावे 158 वाड्यांना 38 टॅंकर, कोपरगाव- 2 गावे 19 वाड्यांसाठी 2 टॅंकर, राहुरी- 2 गावे 1 टॅंकर, नेवासे- 3 गावे 3 वाड्यांना 3 टॅंकर, राहाता- 1 गाव 19 वाड्यांना 3 टॅंकर, नगर- 29 गावे 168 वाड्यांना 40 टॅंकर, पारेनर- 62 गावे 412 वाड्यांना 90 टॅंकर, पारनेर नगर पंचायत- 1 गाव 35 वस्त्यांवर 16 टॅंकर, पाथर्डी- 98 गावे 574 वाड्यांना 123 टॅंकर, शेवगाव- 39 गावे 96 वाड्यांना 34 टॅंकर, कर्जत- 44 गावे 253 वाड्यांसाठी 55 टॅंकर, जामखेड- 24 गावे 21 वाड्यांना 24 टॅंकर, श्रीगोंदा- 20 गावे 174 वाड्यांसाठी 28 टॅंकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)