बाबूजींच्या अजरामर गीतांनी उजळली दिवाळीची पहाट

लोकप्रिय गीतांनी रसिक मंत्रमुग्ध : ‘चैतन्य’च्या दिवाळी पहाटला प्रतिसाद, मैफल रंगली

नगर – फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश… देव देव्हाऱ्यात नाही…सखी मंद झाल्या तारका…संथ वाहते कृष्णामाई…तोच चंद्रमा नभात…धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना….अशा बाबूजी उर्फ ज्येष्ठ गायक सुधीर फडके यांनी अजरामर केलेल्या मराठी गाण्यांच्या मेजवानीने नगरकर संगीत रसिक रविवारी मंत्रमुग्ध झाले. वसु बारसेनिमित्त चैतन्य फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘एक दिवाळी पहाटवेळी’ कार्यक्रमात ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांनी अनेक प्रसिद्ध मराठी गाणी सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरमध्ये विविध सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम राबवणारे चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत देसाई यांच्या पुढाकाराने मागील 14 वर्षांपासून दरवर्षी दिवाळीत एक दिवाळी पहाटवेळी संगीत मैफल आयोजित केली जाते. यंदा ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगुळकर उर्फ गदिमा, ज्येष्ठ गायक सुधीर फडके व ज्येष्ठ संगीतकार-अभिनेते-साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गाणी बाबुजींची या विशेष संगीत मैफिलीचे आयोजन केले होते. सावेडीच्या माऊली सभागृहात रविवारी सकाळी साडेसहा वाजताच तुडूंब गर्दी झाली होती.

नगरकर संगीत रसिकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाला कलावंतांकडूनही उत्साही प्रतिसाद मिळाला. टाळ्या व शिट्ट्यांनी सभागृह दणाणून गेले. जाळी मंदी पिकली करवंद, हृदयी प्रीत जागते, रंगु बाजारला जाते हो जाऊ द्या, झाला महार पंढरीनाथ, नीज रूप दाखवा हो, तुझे रूप चित्ती राहो, कानडा राजा पंढरीचा अशी अनेकविध मराठी गाणी सादर झाली. श्रीधर फडके यांच्यासह शिल्पा पुणतांबेकर व शेफाली कुलकर्णी-साकुरीकर यांनी गाणी सादर केली. त्यांना तबल्यावर तुषार आग्रे, सिंथेसायझरवर अतुल माळी व संदीप मेस्त्री आणि ताल वाद्ये साथसंगत आदित्य आपटे यांनी दिली. या मैफिलीचे रसाळ निवेदन सुकन्या जोशी यांनी केले.

चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत देसाई यांनी स्वागत केले. भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, संस्कार भारतीचे अखिल भारतीय सहकोष प्रमुख रवींद्र बेडेकर तसेच ब्रिजलाल सारडा, संजय शिंगवी, विजय गांधी, अशोक गांधी, आदेश चंगेडिया, जवाहर मुथा, डॉ. अभिजीत पाठक, सुनील रामदासी, राजेश देशपांडे, प्रवीण बजाज, दिलीप अकोलकर, प्रा. मकरंद खेर, डॉ. मधुसूदन बोपर्डीकर, ज्योती केसकर, चंद्रशेखर करवंदे, बलभीम पांडव, अशोक सोनवणे, पवन नाईक, आदित्य गांधी रिद्धी केटर्सचे अभय सातपुते नितीन चंगेडिया आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. वीणा दिघे यांनी सूत्रसंचालन केले.

सुरुवातीला ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या मैफिलीसाठी अमोल धोपावकर, अशोक जगताप, सागर गंधारे, छाया कुलकर्णी, रश्‍मी पांडव आदींनी परिश्रम घेतले. यावेळी बेडेकर यांनी सुधीर फडके यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. अनेक गाण्यांना वन्समोअर मिळाला. श्रीधर फडके यांनी सुधीर फडकेंच्या विविध गाण्यांच्या आठवणी व किस्से सांगितले. बलसागर भारत होवो…विश्‍वात शोभूनी राहो गाण्याने सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)