सरत्या आश्‍लेषा नक्षत्राच्या पावसाची सर्वदूर हजेरी

जिल्ह्यातील 97 पैकी 12 महसूल मंडलात अतिवृष्टी

नगर  – गेल्या एक महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने सरत्या आश्‍लेषा नक्षत्राच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील 97 महसूल मंडलांपैकी 97 मंडलात हजेरी लावली असून, त्यातील 12 महसूल मंडलात अतिवृष्टी झाली आहे. पडत्या झालेल्या या पावसाने खरीप हंगामावरचे सावट काही प्रमाणात हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी बहुतांशी तालुक्‍याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

जिल्ह्यातील बारा महसूल मंडलात अतिवृष्टी झाली आहे. अकोले भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने मुळा धरणातही पाण्याची आवक वाढली असून, 65.10 टक्‍के पाणी धरणात आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी 213.81 मी. मी. (42.99 टक्के) पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्‍वर बंधाऱ्यातून 3228 क्‍युसेस विसर्ग सोडण्यात आलेला आहे. तसेच भीमा नदीस दौंड पूल येथे 17820 क्‍युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरणातून प्रवरा नदीत प्रवरा नदीत 2210 क्‍युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात 1400 पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन, पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होणार आहे.

यंदाच्या हंगामात 1 जून रोजी रोहिणी नक्षत्रातील पावसाने जिल्ह्यातील काही मंडळात हजेरी लावीत आगमन केले. जूनच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने खरिपाच्या पेरीचा मुहूर्त वेळेवर साधला जाणार, असे भाकीत शेतकरी वर्गात व्यक्‍त केले जात असतानाच 7 दिवसाची दडी मारून पुन्हा 8 जून रोजी पावसाचे आगमन झाले. त्यांनतर मात्र सुमारे 15 दिवस पावसाने दडी मारली.

पावसाच्या या प्रदीर्घ विश्रांतीमुळे खरीप हंगामाचा जीव टांगणीला लागला होता. दिवसा गणीस खरिपाच्या पेरीचा मुहूर्त पुढे पुढे जात असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे मळभ दाटून आले होते. मात्र, मृग नक्षत्राने शेवटच्या दिवशी अर्थात 21 जून रोजी जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील 97 महसुली मंडळांपैकी 80 मंडळात पावसाच्या धारा बरसल्या होत्या. काल सरत्या आश्‍लेषा नक्षत्राच्या पावसाची जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली असून, 97 पैकी 97 मंडलात पाऊस झाला असून, त्यातील बारा मंडलात अतिवृष्टी झाली आहे.

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

जिल्ह्यात अखेर एक महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर सर्वदूर श्रावण महिन्याचा पहिल्याच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांच्या पिकांना श्रावण सरीमुळे खऱ्या अर्थाने जीवदान मिळाले आहे. दिवसभर पावसाच्या सरीने दैनंदिन कामात विस्कळीतपणा आल्याचे चित्र होते.

मंडलनिहाय अतिवृष्टी

नेवासा तालुक्‍यातील वडाळा बहिरोबा. नगर तालुक्‍यातील-नागापूर, सावेडी. पारनेर तालुक्‍यातील-टाकळी ढोकेश्‍वर. कोपरगाव तालुक्‍यातील-सुरेगाव, रवंदे. श्रीरामपूर तालुक्‍यातील-श्रीरामपूर, उंदिरगाव, बेलापूर, टाकळीभान. राहुरी तालुक्‍यातील-ब्राह्मणी. राहाता तालुक्‍यातील-पुणतांबा

धरणातील पाणीसाठा (एमसीएफटीमध्ये)

(धरण, क्षमता, यावर्षीचा साठा, टक्के )
भंडारदरा, 11039, 11039, 100
मुळा, 26000, 16925, 65.10
निळवंडे, 8320, 7011, 84.27
आढळा, 1060, 329, 31.04
मांडओहळ, 399, 68.67, 17.21
घोड, 7639, 3471.66, 45.45
खैरी, 533, 91.98, 17.16
सीना, 2400, 635.27, 26.47

जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने सोयाबीन, कापूस, बाजरी आदी खरीप पिकांना जीवदान मिळणार असल्याने, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण राहील. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस झाला तर पिकांना आणखी फायदेशीर ठरणार आहे.
-पंडित लोणारे ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)