ढोकराईत रविवारी ऊस पीक परिसंवाद

‘नागवडे’ कारखाना व जैन इरिगेशनचा संयुक्त उपक्रम

श्रीगोंदा – ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी “नागवडे’ कारखाना व जैन इरिगेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने येत्या रविवारी (दि.19) ढोकराई येथे ऊस पीक परिसंवाद व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती “नागवडे’ कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी दिली.

-Ads-

मगर म्हणाले की, “नागवडे’च्या कार्यक्षेत्रात ऊसाखालील क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. मात्र एकरी ऊस उत्पादनात घट होत आहे. जमिनीची सुपिकता व पोत कमी होत असल्याने ऊस उत्पादनात घट होत आहे. राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या पुढाकार व मार्गदर्शनाखाली “नागवडे’ कारखान्याने यापूर्वी अनेकदा शेतकरी मेळावे व तज्ञांची व्याख्याने आयोजित केली होती. यावर्षी 19, 20 व 21 जानेवारी रोजी कारखाना कार्यस्थळावर कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा घेतला होता. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी उत्पादनात वाढ करावी यासाठी “नागवडे’चे व्यवस्थापन अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने प्रयत्न करीत आहे.

रविवारी दुपारी बारा वाजता ढोकराई येथील प्रगती मंगल कार्यालयात होणाऱ्या ऊस पीक परिसंवाद व शेतकरी मेळाव्याचे अध्यक्षस्थान “नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे भूषविणार असून महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे संशोधन संचालक प्रा. डॉ. हरिहर कौसडीकर यांचे जमिनीचे आरोग्य या विषयावर, ऊस भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी संजीव माने यांचे एकरी 100 मेट्रीक टन ऊस उत्पादन घेण्याचे तंत्र या विषयावर तर जैन इरिगेशनचे कृषी विद्यावेत्ता उमेश इंगवले यांचे ऊसासाठी ठिबक सिंचन पध्दतीची आवश्‍यकता व फायदे या विषयावर व्याख्यान होणार आहे.

मगर म्हणाले, या मेळाव्यात विविध कंपन्यांचे स्टॉल लावण्यात येणार असून शेतकऱ्यांना माहितीपत्रके देवून प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जाणार आहे. ऊसाची जातवार, हंगामवार लागण, तोडणीचे नियोजन, खोल मशागत, रुंद व लांब सरीचा वापर, सेंद्रीय व जैविक खतांचा वापर, माती परिक्षणानुसार संतुलीत खतांचा वापर, पीक फेरपालट व हिरवळीच्या खतांचा वापर व पीक संरक्षण, ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब याविषयी शेतकऱ्यांना या परिसंवाद व शेतकरी मेळाव्यात सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

“नागवडे’ कारखाना व जैन इरिगेशनच्या पुढाकाराने होणाऱ्या ऊस पीक परिसंवाद व शेतकरी मेळाव्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उपाध्यक्ष केशवराव मगर, जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक सचिन चेपे, कारखान्याचे कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, शेतकी अधिकारी शशिकांत आंधळकर व संचालक मंडळाने केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)