देवळाली पालिकेचे काम कौतुकास्पद

जिल्हाधिकारी : स्वच्छता अभियानाची केली पाहणी

राहुरी फॅक्‍टरी -देवळाली प्रवरा नगरपालिकेचे स्वच्छता अभियानात चांगले काम आहे. ओढया-नाल्यावर खोलीकरण व रुंदीकरण करून पाणलोट क्षेत्र निर्माण केले आहे. ओढया-नाल्यावर दोन्ही बाजूला बांबूचे रोपण करण्यात येणार आहे. भविष्यकाळात त्याचा निश्‍चित फायदा होईल, असे गौरवोद्‌गार जिल्हाधिकारी राहुलकुमार द्विवेदी यांनी केले आहे.

-Ads-

देवळाली प्रवरा नगरपालिकेला द्विवेदी यांनी सदिच्छा भेट दिली. स्वच्छता अभियानातील विविध प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली. नवीन प्रकल्पासंदर्भात माहिती घेतली. नगरपालिका सभागृहात त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, प्रांताधिकारी शैलेश चव्हाण, तहसीलदार अनिल दौंडे, मुख्याधिकारी नानासाहेब महानवार, नगरसेवक आण्णासाहेब चोथे आदी उपस्थित होते. देवळाली प्रवरा नगरपालिका हद्द संपूर्ण हागणदारीमुक्‍त झाल्याबद्दल द्विवेदी यांच्या हस्ते कदम व संसारे, महानवार यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

द्विवेदी यांनी आपल्या भाषणात नगरपालिकेच्या कामाचे कौतुक केले. कदम, संसारे व नगरसेवक कमल सरोदे, ज्ञानेश्‍वर वाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राहुरी कारखाना येथील प्रसादनगर भागातील दगडी खाण बुजविण्यास परवानगी मागितली. ती मान्य करून तेथे नवीन प्रकल्प उभारण्यास प्रशासनाकडून कोणतीही अडचण येणार नाही, असे आश्‍वासन द्विवेदी यांनी दिले. 2018-19 मध्ये नगरपालिकेला स्वच्छता अभियानात चांगले यश येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

या वेळी कदम म्हणाले, की नगरपालिका हद्दीत पोहण्यासाठी स्वतंत्र तलाव बांधण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांसाठी व्यायामशाळा व शहरात भूमिगत गटारी बांधण्यात येतील. हे शहर वाडया-वस्त्यांवर वसलेले आहे. तेथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके ग्रंथालयामार्फत उपलब्ध करुन दिली जातात. स्वच्छता अभियानात शालेय पासबुक योजना राबवून शाळेतील विद्यार्थ्यांना कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची सवय लावली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वच्छता अभियानात घनकचरा वर्गीकरणाचे उत्कृष्ट काम करणाऱ्या सुनील खाटिक, नितीन पटारे, अरुण सरोदे, संतोष अवसरकर, अशोक मुसमाडे, पांडुरंग कांबळे, स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या शाळांचे प्रतिनिधी संपत सोनवणे, अंगणवाडी सेविका शर्मिला रणधीर, मंगल लगे, जयश्री सूर्यवंशी, सुशीला डावखर, सविता येवले, रेखा हारदे, वैशाली शेटे आदींना स्वच्छता अभियानाचे बक्षिसपत्र देऊन गौरविण्यात आले. वैष्णवी, विजया, जिजामाता, तनिष्का, गीता आदी महिला बचतगटांना त्यांच्या हस्ते खेळत्या भांडवलाचे वाटप करण्यात आले. सुनील गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. गटनेते सचिन ढुस यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)