नगर-दौंड महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा !

file photo

दोन महिन्यात सात जणांनी गमावले प्राण

समीरण बा. नागवडे

श्रीगोंदा  – सुमारे 1 हजार 50 कोटी खर्चाच्या मनमाड-फलटण रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने आणि नव्याने तयार होत असलेल्या रस्त्याला दुभाजक नसल्याने अपघातांचे प्रमाण खूपच वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांत तब्बल सात जणांना प्राण गमवावे लागले आहेत. आधी नगर-दौंड रस्त्याची दुरवस्था असल्याने अपघात होत होते;आता रस्ता चांगला होत असताना देखील अपघातांचे प्रमाण वाढल्याने नगर-दौंड महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय असाच सवाल उपस्थित होत आहे.

गेले कित्येक वर्षे नगर-दौंड रस्त्याची दुरवस्था झाली होती, रस्त्याची किरकोळ डागडुजी केली जात होती. मात्र, नंतरच्या काळात रस्ता डागडुजी करून देखील दुरुस्त होत नव्हता. यामुळे अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले होते, नगर-दौंड रस्त्याची चाळण झाल्याने त्याकाळात अनेकांना प्राण गमवावे लागले.

नगर-दौंड रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी सगळ्यांनी उचलून धरली होती. मनमाड ते फलटण राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळाल्याने नगर-दौंड रस्त्याचे भाग्य उजळले.नगर ते वासुंदे फाटा या 93 किलोमीटरच्या टप्प्याच्या कॉंक्रीटीकरण कामासाठी सुमारे 1 हजार 50 कोटींचा निधी मंजूर झाला. सुरुवातीला रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर किरकोळ अपघात वाढले. मात्र आता रस्त्याचे काम निम्म्या टप्प्यात आले असताना नगर-दौंड मार्गावरील अपघातांचे प्रमाण खूपच वाढले आहे.

नगर-दौंड रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम पूर्ण होऊन निम्मा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र या रस्त्यावर दुभाजक नाहीत, रस्त्यावर कुठेही पांढरे पट्टे मारलेले नाहीत; परिणामी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यातच रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने देखील वाहने अपघातग्रस्त होत आहेत. गेल्या दोन महिन्यात नगर-दौंड मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये सात निरपराधांना प्राण गमवावे लागले आहेत.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस चिखली घाटात झालेल्या अपघातात तिघांना प्राण गमवावे लागले होते. ऑक्‍टोबर महिन्यात काष्टी शिवारात झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, मढेवडगाव येथे चारचाकी रस्त्याच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात देखील एका व्यक्तीचा मृत्यू ओढवला होता. गुरुवारी (दि.8) कोळगाव शिवारात झालेल्या अपघातात श्रीरामपूर तालुक्‍यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

ज्या भागात रस्त्याचे काम सुरू आहे, तेथे रस्त्यावर मुरूम पडलेला आहे. ज्या भागात रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तेथे रस्त्याला दुभाजक नसल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. रस्त्याच्या मध्यावर साधे पांढरे पट्टे देखील अद्याप मारण्यात आलेले नाहीत. त्यातच आता साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने रस्त्याची वर्दळ वाढली आहे. ऊसाचे ट्रॅक्‍टर, ट्रक आणि बैलगाड्यांमुळे वाहतूक धिमी होते.

पूर्वी नगर-दौंड रस्ता खराब असल्याने अपघात घडत होते. आता नगर-दौंड रस्त्याचे कॉंक्रीटीकरण होऊन देखील तीच अवस्था कायम आहे. उलट अपघातांचे प्रमाण वाढले असून गेल्या दोन महिन्यात सात जणांना प्राण गमवावे लागले आहेत. छोट्या अपघाताच्या घटनांमध्ये जखमी होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.

कॉंक्रीटीकरण झालेल्या रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी आवश्‍यक ती उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. रस्ता खराब असताना देखील अन्‌ आता रस्ता चांगला होऊन देखील अपघातांचे प्रमाण वाढल्याने नगर-दौंड रस्ता मृत्यूचा सापळा बनतोय की काय असाच सवाल उपस्थित होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)