पाथर्डीत चोरट्यांचा धुमाकूळ

वेगवेगळ्या तीन घटनात लाखोंचा ऐवज लंपास

पाथर्डी – तालुक्‍यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या तीन घटनांमध्ये अज्ञात चोरांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. शनिवारी पहाटेच्या सुमारास मोहोज देवढे येथे अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून 68 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. या घटनेत चोरांशी झालेल्या झटापटीत द्रोपदाबाई रावसाहेब गर्जे या वृद्ध महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
द्रोपदाबाई यांचा मुलगा ज्ञानेश्वर कामानिमित्त बाहेरगावी असतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शुक्रवारी रात्री द्रोपदाबाई घरात झोपल्या होत्या तर त्यांच्या सून सविता घरासमोरील लोखंडी गेट असलेल्या बंद पडवीत झोपल्या होत्या. शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास गेट वाजल्याचा आवाज आल्याने सविता यांना जाग आली. त्यांनी द्रोपदाबाई आवाज देवून उठवले. दोघीही सासु सुना बाहेर आल्या. तेव्हा लोखंडी गेटवर उभ्या असलेल्या दोघा अज्ञात चोरांनी लोखंडी गेटला हिसका देवून घरात प्रवेश केला.

चाकू व लोखंडी दांडक्‍याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. कपाट तोडून सुटकेस मधील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 68 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यावेळी चोरांशी झालेल्या झटापटीत चाकू लागून द्रोपदाबाई यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. द्रोपदाबाई गर्जे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना तालुक्‍यातील निंबादैत्यनांदूर येथे शनिवारी पहाटे घडली. विजय गाडे व मुलगा घराबाहेर पढवीत झोपले होते. पत्नी शोभा घरात कडी लावून झोपल्या होत्या.शनिवारी पहाटेच्या सुमारास शोभा यांच्या कानातील सोन्याचे झुंबर कोणीतरी जोरात ओढल्याने त्या जोरात ओरडल्या. त्यांचा आवाज ऐकून दारात झोपलेले पती व मुलगा जागे झाले, परंतु तिघेजण अज्ञात चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. चोरट्यांनी शोभा गाडे यांच्या कानातील सात ग्रॅमच्या दागिन्यांसह दोन मोबाईल फोन असा सुमारे सव्वीस हजाराचा ऐवज चोरून नेला. चोरांनी झुंबर ओढल्याने शोभा यांच्या कानाला दुखापत झाली आहे. याबाबत शोभा गाडे यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .

तिसरी घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास माळीबाभुळगाव शिवारात घडली. अज्ञात चोरट्यांनी सरकी पेंडणे भरलेला आयशर टेम्पो गाडी आडवी लावून पळवून नेला आहे. या घटनेत चोरांनी सुमारे 15 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत चालक संदीप पोपट खेडकर (रा.तिनखडी) यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला.जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे चोऱ्याचे प्रमाण वाढले असून तालुक्‍यात सध्या चोरट्यांनी चांगलीच धुमाकुळ घातला आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)