पुण्यातील कारागृहातून पळालेल्या गुंडाचा कर्जतमध्ये खून

कर्जत – पुणे जिल्ह्यातील खेड येथील कारगृहामधून पळालेला फरार आरोपी राहुल देवराव गोयकर याचा कर्जत तालुक्‍यातील खंडाळा येथे खून झाल्याने पुन्हा एकदा कर्जत तालुका हादरून गेला आहे. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गोयकर हा नगरसह सोलापूर जिल्ह्यात विविध गुन्ह्यातील आरोपी होता.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्‍यात मोका अंतर्गत कारवाई झालेला तसेच नगरसह पुणे जिल्ह्यात विविध गुन्ह्यात सहभागी असलेला आरोपी राहुल गोयकर हा खेड येथील तुरुंगात शिक्षा भोगत होता. आठ दिवसांपूर्वीच त्याने पोलिसांना चकवा देत तुरुंगातून पलायन केले होते. खेड व कर्जतचे पोलीस त्याचा तपास करत असतानाच काल रात्री दहा वाजेच्या सुमारास खंडाळा येथे खून झाला असल्याची खबर पोलिसांना मिळाली.

कर्जतचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचले असता राहुल गोयकर हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. पोलिसांनी याबाबत तातडीने हालचाली सुरू केल्या. याबाबत मयताचा मामेभाऊ विनोद खांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयत राहुल याचे संतोष हौसराव गोयकर व हौसराव भानुदास गोयकर यांच्याबरोबर अनेक दिवसांपासून वाद होते.

20 नोव्हेंबर रोजी गावातील धनंजय खांडेकर यांच्या लग्नाचे वरातीमध्ये रात्री नाचण्याचे कारणावरून राहुल गोयकर याचा मित्र आकाश माने व भाऊसाहेब खांडेकर यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून मारामारी झाली. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास आपण घरात जेवत असताना भाऊसाहेब खांडेकर यांच्या घराकडे भांडणाचा आवाज आला.

त्यामुळे तिकडे गेलो असता भाऊसाहेब खांडेकर, त्याचे वडील बबन किसन खांडेकर, आई तोळाबाई बबन खांडेकर, राजेंद्र चौधरी, ताई संतोष हुलगे, उज्वला भाऊसाहेब खांडेकर, हौसराव भानुदास गोयकर, संतोष हौसराव गोयकर हे सर्वजण राहुल गोयकर यास लाकडी दांडक्‍याने मारहाण करत होते. तसेच तेथे उभ्या असलेल्या (एम एच 42- के-6478 ) या गाडीवर दगड मारत होते. यावेळी या सर्वांनी त्यास जीव जाईपर्यंत मारहाण केली. भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता “तू मध्ये पडू नको अन्यथा तुलाही सोडणार नाही’ अशी धमकी दिली.

त्यानंतर मी मयत राहुल याचा भाऊ योगेश यास फोनकरून माहिती दिली. यावेळी तेथे माझी आई कल्पना तेथे आली. बाळासाहेब चोरमले, भाग्यश्री चोरमले हेही तेथे आले. यावेळी तेथे गाडी (एमएच 12 जीएफ 7080) हिच्या काचा फुटलेल्या दिसत होत्या. त्यावेळी राहुल बरोबर त्याचे मित्र विशाल तांदळे (रा.मंचर, कृष्णा रा. परभणी), मनोज गायकवाड (रा. शिवाजीनगर) असे तिघे होते. त्यातील विशाल तांदळे व कृष्णा हे पळून गेले तर मनोज गायकवाड तेथेच होता.

पोलिसांनी या फिर्यादीनुसार आठ आरोपींना तातडीने अटक केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी भेट दिली. या सर्व आरोपीना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 10 दिवसांची कोठडी मिळाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)