चारित्र्याच्या संशयावरून पतीचे कृत्य : स्वतःसही धारदार शस्त्राने करून घेतली इजा
संगमनेर – पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिच्या डोक्यात दगडी पाटा घालून पतीने तिची हत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथे घडली. हा प्रकार सोमवारी (दि. 12) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर काही वेळातच पोलिसांनी आरोपी प्रकाश नामदेव धांडे (वय 33) यास ताब्यात घेतले. प्रकाश धांडे हा पोलिसाचा मुलगा आहे.
शांता प्रकाश धांडे (वय 31) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. शांता व प्रकाश धांडे यांचा सहा महिन्यांपूर्वी संगमनेर तालुक्यातील जवळेबाळेश्वर येथे विवाह झाला होता. विवाहानंतर हे दांम्पत्य श्रीगोंदे येथे वसतिगृहावर काम करत होते. तेथे आरोपी प्रकाश हा पत्नीवर सातत्याने संशय घेत होता.
गेल्या आठवड्यात शांताची आई गंगूबाई महादू तिटकारे या शिवडी (मुंबई) येथे आजारी असल्याने हे दोघेही त्यांना भेटण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी तेथे अन्य नातेवाईकदेखील आलेले होते. याच दरम्यान शांताने आपला पती चारित्र्याचा संशय घेत असल्याची तक्रार आईकडे केली. तसेच यासंबंधी घारगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या आपल्या सासऱ्याला देखील माहिती दिल्याची तिने आईला सांगितले होते. त्यानंतर आईने यासंदर्भात तुझ्या सासऱ्याशी बोलते, असे सांगत तिची समजूत काढली होती.
त्यानंतर आरोपी प्रकाश याच्या आजीचा दहावा आंबेवंगण (ता. अकोले) येथे सोमवारी असल्याने आरोपी प्रकाश, शांता, गंगुबाई, दोन साडू व मेहुण्या यांच्यासह जवळे बाळेश्वर येथील साडू बाळू घोडे यांच्या घरी मुक्कामासाठी रविवारी आले होते. रात्री जेवणानंतर हे सर्वजण झोपी गेल्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या विचित्र आवाजामुळे आरोपी प्रकाशची मेव्हणी कांता झोपेतून जागी झाली.
तिने आवाजाच्या दिशेने शोध घेतला असता, तिची बहीण रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडल्याचे दिसल्याने तिने आरडाओरड केली. त्यामुळे घरातील सर्वजण जागे झाले. शांता हिच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या. तेथे रक्ताने माखलेला दगडी पाटा आढळून आला. तसेच शांताचा पती तेथून गायब झाला होता.
घटनेची माहिती कामगार पोलीस पाटलाने घारगाव पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपीचा पोलिसांनी घटनेनंतर तत्काळ शोध घेतला असता, तो संगमनेर शहरातील वडील राहत असलेल्या पोलीस कॉलनीतील घरासमोर बसलेला आढळा.
आरोपी प्रकाशाने स्वतःच्या शरीरालाही धारदार हत्याराने इजा करून घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. यासंदर्भात मयत शांता यांच्या आईने घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांनी भेट दिली असून, उपनिरीक्षक योगेश मोहिते तपास करत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा